महापौर सविता कांबळे यांना शेतकऱ्यांचे निवेदन
बेळगाव : दरवर्षी पावसामुळे लेंडी नाला परिसरातील शिवाराला तसेच शहरालाही पूर येत आहे. राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटचे बॉक्स आहेत. ते पूर्ण बुजले आहेत. तेव्हा ते बॉक्स खुले करावे. लेंडी नाल्यातून पाणी निचरा होण्यासाठी दुरुस्ती करावी, अशा मागणीचे निवेदन बेळगाव शेतकरी संघटनेच्यावतीने महापौर सविता कांबळे यांना देण्यात आले. यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण उपस्थित होते. नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नाला फुटून शिवारात पाणी शिरले. यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. राष्ट्रीय महामार्गाला असलेले काँक्रिटचे बॉक्स पूर्णपणे बुजले आहेत. त्यामुळे पाणी पूर्वेकडच्या बाजुला जाणे अशक्य झाले आहे. आता आम्हाला शेतीच नको झाली आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करावा व आम्हाला जीवन जगायला मदत करा, अशी विनवणी नारायण सावंत यांनी महापौरांकडे केली.
शहरातील सर्व पाण्याचा निचरा लेंडी नाल्यातून होत असतो. मात्र हा नाला अनेक ठिकाणी फुटला आहे. याचबरोबर राष्ट्रीय महामार्गातून पूर्वेकडच्या बाजुला पाण्याचा निचरा होणे अवघड झाले आहे. परिणामी त्याचा फटका शिवाराबरोबरच शहराला बसत आहे. गेली 20 वर्षे आम्ही पाठपुरावा करत आहे. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा यावर्षी तरी गांभीर्याने लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. शहर विकास उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर यांचीही भेट घेण्यात आली. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, मारुती सावंत व शेतकरी उपस्थित होते.









