जुन्या तहसीलदार कार्यालयासमोरील प्रकार
बेळगाव : कचेरी रोडवरील जुन्या तहसीलदार कार्यालयासमोरील गटारीवरील स्लॅब फुटल्याने कार्यालयाला ये-जा करणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. याकडे अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. अपघात घडल्यानंतर अधिकारी जागे होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कचेरी रोडवरील तहसीलदार कार्यालयात विविध कामांसाठी नागरिकांची वर्दळ कायम असते. रेकॉर्ड रूम व भूमी विभाग तसेच सात बारा उतारा वितरण व गरजेची प्रमाणपत्रे वितरण करण्याचे हे केंद्र आहे. त्यामुळे सतत नागरिकांची वर्दळ असते. असे असतानाही गटारीवरील धोकादायक स्लॅब हटवून नूतनीकरण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. लोखंडी सळ्या उघड्यावर असल्याने नागरिकांच्या पायाला लागण्याचा धोका आहे. वाहने पार्किंग करण्याचीही गैरसोय झाल्यामुळे कार्यालयाच्या आवारात तसेच रस्त्यावर पार्किंग करावे लागत आहे. वाहतूक कोंडी निर्माण होऊन कार्यालयाच्या आवारातही वाहनांची गर्दी होत आहे. परिणामी नागरिकांना अडचणीतून मार्ग काढून कार्यालय गाठावे लागत आहे. यासाठी गटारीवरील धोकादायक स्लॅब हटवून नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.









