वृत्तसंस्था/ डेन बॉश्च
येथे सुरु असलेल्या एटीपी टूरवरील डेन बॉश्च ग्रासकोर्ट पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या रेली ओपेलकाने रशियाच्या सिडेड खेळाडू मेदव्हेदेवला पराभवाचा धक्का देत एकेरीची उपांत्य फेरी गाठली. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ओपेलकाने मेदव्हेदेवचा 7-6 (7-5), 7-6 (7-5) अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. या सामन्यात ओपेलकाने 24 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. 2021 साली ओपेलकाने अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. तो एटीपीच्या सध्याच्या मानांकनात 11 व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी ओपेलकाने न्यू पोर्ट टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. ओपेलकाचा उपांत्य फेरीचा सामना बेल्जियमच्या बर्जस बरोबर होईल. तसेच फ्रान्सचा हंबर्ट आणि कॅनडाचा डायलो यांच्यात दुसरा उपांत्य सामना होईल. डायलोने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रशियाच्या कॅचेनोव्हचा 7-6 (8-6), 6-4 तर फ्रान्सच्या हंबर्टने पोर्तुगालच्या बोर्जेसचा 6-1, 6-4 असा पराभव केला.
महिलांच्या विभागात द्वितीय मानांकित इक्टेरेना अॅलेक्सेंड्रोव्हाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवताना व्हेरोनिका कुडेरमेटोव्हावर 5-7, 6-4, 6-2 अशी मात केली. अॅलेक्सेंड्रोव्हाचा उपांत्य सामना बेल्जियमच्या तृतीय मानांकित इलेसी मर्टन्स बरोबर होणार आहे. मर्टन्सने चीनच्या युआनवर 6-0, 6-4 अशी मात केली. रोमानियाच्या रुसेने कॅनडाच्या अँड्रेस्क्विचा 6-2, 6-4 असा पराभव करत शेवटच्या 4 खेळाडूत स्थान मिळविले.









