नवी दिल्ली / वृत्तसंस्था
खनिज इंधन तेलाचे उत्पादक देश आणि इतर तेल उत्पादक देश यांच्या ओपेक प्लस या संस्थेने इंधन तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. विकसित अर्थव्यवस्था असणाऱया देशांकडून तेलाच्या मागणीत घट होत आहे. त्यामुळे उत्पादन घटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या निर्णयाचा भारतासारख्या देशांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. भारताला आपल्या आवश्यकतेच्या 85 टक्के तेल आयात करावे लागते. तेल उत्पादक देशांनी उत्पादन घटविल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी, भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. तथापि, यासंबंधात दुमत आहे.
परिणाम होणार नाही
तेल उत्पादक देशांनी उत्पादन कमी केल्यास भारतावर त्याचा काहीही विपरित परिणाम होणार नाही, असे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे. भारतातील तेल शुद्धीकरण केंद्रांना सध्याच्याच दरात तेल पुरविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे उत्पादन कमी झाल्यानंतरही आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा तुटवडा निर्माण होणार नाही. त्यामुळे दर वाढण्याचा प्रश्न येत नाही. शिवाय हे देश किती प्रमाणात उत्पादन कमी करणार यावर बरेच काही अवलंबून आहे.
रशियाकडून आयात
भारत गेल्या सहा महिन्यांपासून रशियाकडून सर्वाधिक प्रमाणात तेल आयात करीत आहे. आपल्या कच्च्या इंधन तेलाच्या आवश्यकतेच्या 35 टक्के इतक्या प्रमाणात तेल भारत रशियाकडूनच खरेदी करत आहे. भारताने मार्च महिन्यात रशियाकडून प्रतिदिन 16 लाख बॅरल तेल आयात केले होते. शिवाय रशियाशी व्यवहार भारत डॉलरमध्ये न करता रुपयात करतो. याचाही लाभ भारताला होतो. ओपेक प्लस देशांनी उत्पादन कमी केल्यास भारत रशियाकडून अधिक प्रमाणात तेल घेऊन आपली आवश्यकता भागवू शकतो. त्यामुळे भारतावर या निर्णयाचा विशेष परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करण्यात येत आहे.
लवकरच स्थिती स्पष्ट होणार
तथापि, प्रत्यक्ष तेल उत्पादनात घट सुरु झाल्यानंतरच स्थिती अधिक स्पष्ट होणार आहे. भारताने आपली तेलसाठा करण्याची क्षमताही गेल्या आठ वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढविली आहे. त्यामुळे तेलदरांच्या अस्थिरतेचा परिणाम तत्काळ स्वरुपात देशावर होत नाही, हा मुद्दाही स्पष्ट करण्यात आला आहे. सध्याच्या काळात भारतात रशियाकडून कच्चें इंधन तेल आंतरराष्ट्रीय किमतीपेक्षा काहींशा कमी दरात रशियाकडून उपलब्ध होत आहे. इतर युरोपियन देशही भारताच्या माध्यमातून रशियाकडून तेल खरेदी करीत आहेत. याचाही लाभ भारताला होत आहे. भारताकडे रशियाचा पर्याय उलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात असणाऱया तेलाच्या उपलब्धतेचा परिणाम सौम्य होणार आहे.









