नवी दिल्ली :
ओपेक या तेल उत्पादक संघटनांच्या सदस्यांनी सोमवारी बैठकीमध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये पुन्हा एकदा घट करण्याचे निश्चित केले आहे. आगामी काळामध्ये प्रतिदिवसाला 22लाख बॅरल इतके उत्पादन कमी करण्याचा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला आहे. या बातमीनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ होऊन ते 83 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते.
जागतिक बाजारातील परिस्थिती त्याचप्रमाणे वैश्विक पातळीवरील अस्थिर भूराजकीय स्थिती लक्षात घेऊन ओपेक संघटनेने मागणीचा अंदाज काढत कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपातीसंदर्भातील निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. मध्य पूर्वेतील अशांतता, इस्त्रायल-हमास यांच्यातील संघर्ष आणि लाल समुद्रामध्ये जहाजांवर होणारे हौती बंडखोरांचे हल्ले यापार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या उत्पादनाबाबत वरीलप्रमाणे ओपेक संघटनेने सर्वसंमतीने निर्णय घेतला आहे.









