नवी दिल्ली : आता इथर इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 2999 रुपयांच्या मासिक ईएमआयवर उपलब्ध होणार आहे. यामध्ये कंपनीचा दावा आहे की ग्राहकांना 5 मिनिटांपेक्षा कमी वेळेत ई-स्कूटरसाठी 100 टक्के ऑन-रोड कर्जमंजुरी मिळू शकेल. यासाठी बंगळुरूस्थित ई-स्कूटर निर्माता कंपनी इथर एनर्जीने बजाज फायनान्स लिमिटेड (बीएफएल), आयडीएफसी फर्स्ट आणि हिरो फिनकॉर्पसोबत भागीदारी केली आहे. इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने वित्त योजना जाहीर केली असल्याची माहिती आहे. या योजनेअंतर्गत, खरेदीदारांना 60 महिन्यांसाठी, म्हणजे 5 वर्षांपर्यंत लवचिक कर्ज कालावधीचा पर्याय देखील मिळेल. ही वित्त योजना सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ईव्ही खरेदी करणे सोपे
इथर एनर्जीचे चीफ बिझनेस ऑफिसर रवनीत फोकेला म्हणाले, ‘ग्राहकांना आकर्षक वित्तपुरवठा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी इथरने बजाज फायनान्ससोबत भागीदारी केली आहे. बजाज फायनान्स आमच्या ग्राहकांसाठी ईव्हीची खरेदी सुलभ करेल आणि अधिकाधिक लोकांना मोठ्या प्रमाणावर ईव्ही घेण्यासाठी प्रोत्साहीत करेल.









