पुरुषांना ‘नो एंट्री’
उत्तर केनियाच्या सॅमबुरु काउंटीतील उमोजा गाव हे केवळ महिलांसाठी आहे. या गावात केवळ महिलांचे वास्तव्य आहे. उमोजा हा स्वाहिली भाषेतील एक शब्द असून त्याचा अर्थ ‘एकता’ असा होतो. याची संकल्पना तेथील समुदायाशी संबंधित आहे. 1990 मध्ये लैंगिक हिंसेपासून वाचून पलायन करणाऱ्या महिलांसाठी एक सुरक्षाशिबिर म्हणून स्थापन उमोजा गाव आजही सर्व वयोगटाच्या महिलांचे घर आहे.

मुली आणि महिलांना सुरक्षित वातावरण मिळवून देण्यासाठी या गावात पुरुषांना प्रवेशबंदी आहे. हिंसा अन् गैरवर्तनाला सामोरे गेलेल्या महिलांचेच या गावात प्रामुख्याने वास्तव्य आहे. तसेच कुटुंबीयांनी त्यागलेल्या किंवा बालविवाह आणि इतर कुप्रथांपासून वाचत पलायन केलेल्या महिला येथे राहत असतात. घानातील एका छायाचित्रकाराने या गावाची कथा सर्वप्रथम जगासमोर आणली आहे. या छायाचित्रकाराने गावातील महिलांचे राहणीमान, त्यांच्यासमोरील समस्या, तेथील लहान मुलांच्या भवितव्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
उमोजा गाव हे स्वत:च्या स्तरावर आत्मनिर्भर आहे. या गावात महिला अन् त्यांच्या मुलांद्वारे तयार झालेल्या 50 कुटुंबांचे वास्तव्य आहे. या गावातील रहिवाशांना महिलांचे अधिकार आणि लैंगिक हिंसेविरोधात जागरुक केले जाते. महिलांच्या कुठल्याही मुलाला वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत गावात राहण्याची अनुमती आहे. या गावात पोहोचणे अत्यंत अवघड आहे. येथे कुठल्याही पुरुषाला प्रवेश करता येत नसल्याने या गावाची माहिती फारशी समोर येत नाही.









