जुन्या बसपासची मुदत 30 जूनला संपणार : बसपास प्रक्रिया किचकट असल्याने विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
जुन्या बसपासची मुदत येत्या 30 जून रोजी संपणार आहे. त्यामुळे आता केवळ विद्यार्थ्यांच्या हातात नवीन बसपास मिळविण्यासाठी दोन दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे. आतापर्यंत केवळ साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी बसपास मिळविले आहेत. बसपासची मुदत 30 मे रोजी संपली असली तरी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी 30 जूनपर्यंत ती वाढवून देण्यात आली होती.
मागील दोन वर्षात बसपास प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसपाससाठी ऑनलाईन अर्ज करावे लागत आहेत. ही प्रक्रिया थोडी किचकट आणि वेळकाढू असल्याने बसपास घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. विद्यार्थी बसपास मिळविण्यासाठी निरुत्साही असल्याचे दिसत आहेत. दरम्यान मागील दोन वर्षात शाळा, कॉलेज विस्कळीत झाली होती.
विद्यार्थ्यांच्या संख्येत घट
दरम्यान बसपास मिळविणाऱया विद्यार्थ्यांची संख्या घटली होती. यंदा शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्यानंतर तातडीने बसपास प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी असल्याचे दिसत आहे. दरवषी बेळगाव, खानापूर, बैलहोंगल या विभागातून 76 हजार विद्यार्थी बसपास घेतात. त्या तुलनेत यंदा बसपास काढणाऱया विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.
दोन दिवस शिल्लक
विद्यार्थ्यांना नवीन बसपास मिळविण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत बसपास न मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रवासासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. एकत्रित विद्यार्थ्यांचे अर्ज जमा करून बसपास विभागात दिल्यानंतर तयार झालेले बसपास एकत्रितपणे दिले जात आहेत. येत्या गुरुवारपर्यंत बसपास न मिळाल्यास विद्यार्थ्यांना तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे.
बसपास नसलेल्यांना तिकीट घ्यावे लागणार…
30 जून रोजी बसपासची मुदत संपणार आहे. त्यानंतर बसपास नसलेल्या विद्यार्थ्यांना तिकीट घ्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जुन्या बसपासची मुदत वाढवून देण्यात आली होती. मात्र काही विद्यार्थ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
– ए. वाय. शिरगुप्पीकर (डेपो मॅनेजर, बसपास विभाग)









