प्रतिनिधी/ पणजी
पोर्तुगीज राजवट असताना उध्वस्त करण्यात आलेल्या मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी पुरातत्त्व आणि पुराभिलेक खात्याकडे एकूण 16 अर्ज आले असून, या अर्जांची छाननी करण्यास सुरवात करण्यात आली आहे. पुरावे सिद्ध करणाऱया मंदिरांचीच पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याचे पुरातत्त्व आणि पुराभिलेख खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
पोर्तुगीज राजवट असताना शासकांनी अनेक मंदिरांची धूळधाण केली होती. अशी मंदिरे पुन्हा उभी राहावीत, यासाठी खात्याचा प्रयत्न असून, त्यादृष्टीने अर्ज मागविण्यात आले होते. खात्याकडे 16 अर्ज आले असून, त्यांची छाननी करण्याचे काम सुरू झाले आहे. यातील पाच देवस्थानांनी पुरावे सादर केले असल्याचेही मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.
पुनर्बांधणीची मागणी करणाऱया आलेल्या अर्जापैकी काहीजणांनी पुस्तकांचा आधार घेतला आहे. ऐतिहासिक वारसा स्थळांविषयीचे पुस्तकही पुरावे म्हणून जोडण्यात आलेले आहेत. खात्याने केलेल्या आवाहनानुसार अर्ज आले असून, त्यात पोर्तुगीज कालखंडातील अस्तित्वात असलेल्या मंदिराची यादी, स्थळ व माहिती पाठविण्यात आली आहे.
पुरावे सादर केलेली मंदिरे
पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या मंदिरांची पुन्हा उभारणी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुरातत्त्व खात्याने पुरावे सादर करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत श्री देवकीकृष्ण देवस्थान (चोडण), देवनारायण देवस्थान (डिचोली), विजयादुर्गा देवस्थान (सांकवाळ), रामचंद्र देवस्थान (गिमोणे-डिचोली) व महादेव देवस्थान (दिवाडी) यांनी पुरावे सादर केलेली आहेत.









