शिवव्याख्याते सुदर्शन शिंदे यांचे उचगाव येथील व्याख्यानात युवा पिढीला मार्गदर्शन : श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आयोजन
वार्ताहर /उचगाव
आजचा युवक भरकटतच चालला आहे. व्यसनाच्या जाळ्यात अडकतो आहे. डीजेवर ताल धरतो. ज्या तोंडाने छत्रपती शिवाजी महाराज, श्रीप्रभू रामचंद्र, छत्रपती संभाजीराजे यांची नावे घेतली जातात आणि त्याच तोंडामध्ये गुटखा, सिगारेट, दारू चाखतो हे कुठेतरी थांबले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज डोक्मयावर आपण घेतलो आहोत. पण छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या डोक्मयात केव्हा शिरणार? हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आणि त्यांचे कर्तृत्व तुम्हाला समजेल. त्याचवेळी या युवा पिढीत काहीतरी बदल घडेल, आणि हे घडविण्यासाठीच हा व्याख्यानाचा खटाटोप आहे असे वाटते, असे परखड विचार वाघोला ता. कवठेमहांकाळ जि. सांगलीचे शिवव्याख्याते सुदर्शन शिंदे यांनी रविवारी उचगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात व्यक्त केले. अयोध्या येथे श्रीरामप्रभूंच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा समारंभ पार पडला. याचे औचित्य साधून उचगाव येथील माऊती मंदिर देवस्थानच्यावतीने रविवार दि. 21 रोजी सायंकाळी 8 वा. शिवव्याख्याते सुदर्शन शिंदे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख शिवव्याख्याते म्हणून सुदर्शन शिंदे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम हे उपस्थित होते. प्रारंभी त्यांच्या हस्ते माऊती मंदिरातील माऊती मूर्तीचे पूजन करण्यात आले. तर ग्रा. पं.उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. तर श्रीरामप्रभू लल्लांच्या मूर्तीचे पूजन ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे, सदस्या भारती जाधव, रूपा गोंधळी, अमरीन बंकापुरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सदस्य जावेद जमादार, राकेश बांदिवडेकर, सुनील देसाई, शशिकांत जाधव, कृष्णा होनगेकर, सागर चौगुले, शरद जाधव, संजय चौगुले, सुरेश मण्णूरकर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते भगवे फेटे, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. संपूर्ण देशभर श्रीरामप्रभूंचा जयघोष होताना दिसतो आहे. त्याचाच एक भाग म्हणून उचगावमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्रीरामप्रभू जसे एक वचनी, एक पत्नी होते, तोच आदर्श आजच्या पिढीने घ्यावा, असे मत युवराज कदम यांनी अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले. तर लँडट्रिब्युनलचे माजी संचालक बाळासाहेब देसाई बोलताना म्हणाले, कोणतेही कार्य, कार्यक्रम करताना जसे देशांमध्ये आज अयोध्यात एकजुटीने कार्यक्रम होताना दिसतो आहे, तसाच कार्यक्रम उचगावमधील सर्व युवकांनी एकत्र येऊन एकजुटीने कार्यक्रम हाताळावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाला उचगाव आणि परिसरातील शिवभक्त, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एन. ओ. चौगुले यांनी केले.









