खानापूर तालुक्यातही गंभीर स्थिती : जिल्हा प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ, पाणी इतर तालुक्यांना पळविल्यामुळे टंचाई
बेळगाव : जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त खानापूर तालुक्यामध्ये पाऊस कोसळतो. मात्र याच तालुक्यातील चार गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. याचबरोबर बेळगाव तालुक्यातील 9 गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. निपाणी तालुक्यातील 4 गावांना आणि रायबाग तालुक्यातील एका गावाला अशा जिल्ह्यातील एकूण 18 गावांना पाणीपुरवठा टँकरने करण्यात येत आहे. दरवर्षी खानापूर आणि बेळगाव तालुक्यांमध्ये इतर तालुक्यांपेक्षा अधिक पाऊस कोसळतो. मात्र याच तालुक्यातील अधिक गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यावरुन या तालुक्यातील पाणी इतर तालुक्यांना वळवून त्या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे उघडकीस येत आहे. वास्तविक खानापूर तालुक्यामध्ये एखादे मोठे जलाशय निर्माण करून खानापूरसह परिसरातील गावांना त्या जलाशयामधून पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. मात्र खानापूर तालुक्यामध्ये आतापर्यंत कधीच मोठे जलाशय उभे करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. मराठी भाषिक तालुका असल्यामुळे जाणूनबुजून या तालुक्याचा विकास साधला जात नाही. पाणी व इतर समस्यांमुळे या तालुक्यातील जनतेला नेहमीच टक्कर द्यावी लागत आहे.
खानापुरात 2022 मध्ये सर्वाधिक 2471 मी.मी. पावसाची नोंद
पावसाळ्यात पाण्याची समस्या तर उन्हाळ्यात जंगली प्राण्यांचा वावर यामुळे दुर्गम भागातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खानापूर तालुक्यामध्ये 2019 मधील जानेवारी ते डिसेंबरपर्यंत 1960 मी.मी.पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2020 मध्ये 2223 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2021 मध्ये 2145 मी.मी. पाऊस तर जानेवारी ते डिसेंबर 2022 मध्ये 2471 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडत आहे. मात्र या तालुक्यातील अनेक गावे कोरडी राहत आहेत.
सर्वाधिक पाऊस खानापूर तालुक्यात
सर्वात जास्त पाऊस खानापूर तालुक्यामध्ये पडल्याची नोंद आहे. मात्र या तालुक्यातील अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर काही गावांतील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मलप्रभा नदी असूनही त्या नदीचे पाणी या परिसरातील गावांना दिले जात नाही, हे दुर्दैव असल्याचे आता उघडकीस येत आहे. यातच म्हादईचे पाणीदेखील वळवून ते देखील नेण्याचा घाट घालण्यात आला आहे. याकडे आता स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देणार का? हे पहावे लागणार आहे.
निपाणीतही समाधानकारक पाऊस
निपाणी तालुक्यातही पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. 1200 ते 1300 मी.मी.पर्यंत पावसाची नोंद होत असते. त्यामुळे या तालुक्यामध्येही तसा पाऊस बऱ्यापैकी आहे. मात्र सध्या या तालुक्यातील चार गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. रायबाग तालुक्यातील एका गावाला सध्या टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. एकूणच अधिक पाऊस पडणाऱ्या तालुक्यांनाच टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गेल्या चार वर्षांमध्ये बेळगाव तालुक्यातही दमदार पाऊस…
खानापूरनंतर बेळगाव तालुक्यामध्ये अधिक पाऊस पडतो. गेल्या चार वर्षांमध्ये बेळगाव तालुक्यातही दमदार पाऊस झाला आहे. बेळगाव तालुक्यामध्ये 2019 मध्ये 1866 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. 2020 मध्ये 1330 मी.मी., 2021 मध्ये 1319 मी.मी.पाऊस तर 2022 मध्ये 1360 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. मात्र या तालुक्यातही सध्या 9 गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्यामध्येही मोठे जलाशय नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. शहरासाठी हिडकल आणि राकसकोप या जलाशयांतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र तालुक्यातील गावांना एकही मोठे जलाशय नसल्याने पावसाचे पाणी इतर तालुक्यांना जात असल्याचे दिसून येत आहे.









