औद्योगिक वसाहतमधींल गैरकारभार
प्रतिनिधी / मडगाव
गोव्यातील औद्योगिक वसाहतीतील गैरकारभारावर सत्ताधारी भाजप आमदार डॉ. देविया राणे आणि राजेश फळदेसाई यांनी विधानसभेतील प्रश्नाच्या उत्तरावरील चर्चेत तसेच माझ्या लक्षवेधी सूचनेवर चर्चा करताना सरकारला आरसा दाखवला याचा मला आनंद आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
आपण गोव्यातील औद्योगिक वसाहतींमधील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अधिपत्याखालील तज्ञांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय चौकशी आयोगाची मागणी करणारा खासगी सदस्य ठराव मांडला होता. परंतू सदर ठराव कामकाजात सूचीबद्ध झाला नाही, अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.
वाळपईच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी होंडा औद्योगिक वसाहतीमधील विविध औद्योगिक आस्थापनांकडून होत असलेल्या अनियमितता आणि उल्लंघनांचे कथन करून सरकारचा पर्दाफाश केला. कुंभारजुवाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी खोर्ली औद्योगिक वसाहतीबाबत सरकारच्या भोंगळ कारभारावर निशाणा साधला, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील अवैधता, प्रदूषण आणि अतिक्रमणांचा मुद्दा मी सातत्याने मांडत आहे. केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता यांनी देखील कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाने केपेंच्या शेतकऱ्यांवर संकट ओढवले असल्याचे सांगून चिंता व्यक्त केली असे युरी आलेमाव म्हणाले.
मला मिळालेल्या विधानसभेच्या प्रŽांच्या उत्तरांवरून कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये सर्व प्रकारचे उल्लंघन होत असल्याचे उघड होत आहे. मोठी आपत्ती होण्यापूर्वी सरकारने कारवाई करण्याची हीच वेळ आहे, असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याची दखल घेवून कारवाई करतील आणि सरकारी मार्गदर्शकतत्त्वांचे उल्लंघन करणारे सर्व कारखाने व आस्थापने बंद करतील , अशी अपेक्षा आपण धरतो असे युरी आलेमाव म्हणाले.









