कोल्हापूर :
कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे. शहरालगतची जी काही गावे आहेत. ती प्राधान्यक्रमाने कोल्हापूर हद्दवाढीत घ्यावीत, अशीच आपली पाहिल्यापासून भूमिका राहली आहे. परंतू कोल्हापुरातील काही लोकप्रतिनिधीच हद्दवाढीच्या आडवे येत असल्याचा गोप्यस्फोट मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शासन पातळीवर हद्दवाढीचा निर्णय घेणार म्हटल्यावर प्रस्तावित गावातील नागरिक आंदोलन करतात. या कारणांमुळेच आतापर्यंत हद्दवाढ रखडली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विकासकामांसह अन्य विषयांच्या आढावा बैठकीसाठी आले होते. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, विरोध असल्यानेच हद्दवाढ करण्याचा निर्णय शासनाला घेण्यात अडचणी येत आहेत. कोल्हापुरातील काही लोकप्रतिनिधी यासाठी अडवे येतात. हद्दवाढ होत नाही, ही खंत आम्हालाही आहे. हद्दवाढ करणार असे शासन म्हटल्यानंतर हद्दवाढ विरोधातील मोर्चा काढतात. हद्दवाढीचा निर्णय घेण्यासाठी इच्छाशक्ती खंबीर पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगरविकास विभागाचे मंत्रीपद आहे. त्यांना मी आणि आमदार राजेश क्षीरसागर पुन्हा भेटून हद्दवाढ लवकरात–लवकर करावी, अशी मागणी करणार आहे.
छावा चित्रपटाच्या वादासंदर्भात ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. छावा चित्रपटाविषयी मंत्री उदय सामंत, संभाजीराजे छत्रपती यांनी काही मुद्दांवर अक्षेप घेतला आहे. या चित्रपटात जर इतिहासाला अनुरूप नसेल तर त्यांच्यामध्ये दुरूस्ती झाली पाहिजे, अशीच आपलही भावना आहे. बीड प्रकरणाबाबत ते म्हणाले, संशयितास मोका लावला आहे. निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी सुरू आहे. एकूणच संबंधिताविरोधात कारवाई सूरू आहे. सीपीआरमध्ये अद्यपही काही अतिक्रमण असल्याबाबत विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसारच सीपीआरमधील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. सीपीआरमध्ये विकासकामासाठी निधी मंजूर केला असून या कामांना अडथळा येत असल्याने ही कारवाई केली आहे. काही कारवाई बाकी असल्यास त्याची माहिती घेतली जाईल.
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा जरंगे–पाटील उपोषणाला बसले आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले, सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले असून अनेक सवलतीही दिल्या आहेत. जरंगे–पाटील यांच्या सग्यासोयाराबाबत सरकारने यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत मुख्यमंत्री योग्य मार्ग काढतील, अशी अपेक्षा आहे. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, बाबासो पाटील असुर्लेकर, आदिल फरास आदी राष्ट्रवादी अजित पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
- पक्षाची ताकद असणाऱ्या प्रभागात स्वबळावर लढू
महापालिकेच्या निवडणूका महायुती एकत्र लढणार की स्वबळावर याबाबत विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, पक्षाची ताकद जेथे असेल त्या प्रभागात स्वतंत्र लढू, ज्या ठिकाणी विरोधक प्रबळ असेल तेथे महायुती एकत्र लढेल. परंतू अद्यपी स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणाचा निर्णय न्यायालयात लागलेला नाही, प्रभाग रचना कशी असणार माहित नाही. हे स्पष्ट होतातच पुढील दिशा ठरविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
- भाजपसोबतचा आमचा अनुभव चांगला
केंद्रात आणि राज्यात भाजप सोबत असणारे पक्ष फुटणार असल्याची संजय राऊत यांनी भविष्यवाणी केली असल्याबाबत विचारले असता मुश्रीफ म्हणाले, भाजप सोबतचा आमचा अनुभव चांगला आहे.
- वाशिमचे पालकमंत्रीपद, नाराज नाही
वाशिमचे पालकमंत्रीपद मिळाल्याने हसन मुश्रीफ नाराज आहेत. प्रजासत्ताक दिनादिवशी वाशिमला ध्वजवंदना होताच बैठक न घेताच त्वरीत पुन्हा ते कोल्हापुरात आल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, पालकमंत्रीपदावरून नाराज असण्याचा सवाल नाही. अजित पवार आमचे नेते असून त्यांच्याकडे यापूर्वीच याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. श्रद्धा आणि सबुरी आपण करायची आहे. वाशिमला झेंडावंदन केले. त्यादिवशी शासकीय कार्यालयाना सुट्टी होती. त्यामुळे बैठक घेतली नाही. पुन्हा जाईन तेव्हा बैठक घेईन.








