होळी झाली, धुलीवंदन झाले, महिला दिन साजरा झाला, रंगपंचमी पुढे आहे, रब्बी हंगामाची समाप्ती करून माणसे आता यात्रा, जत्रा चैत्रीवारी करत आनंदाने, चैतन्याने गुढी उभी करण्याच्या तयारीत होती. तोपर्यंत जो पाऊस आला आणि येतोय त्याने होत्याचे नव्हते झाले आहे. एकूणच अलीकडच्या काळात माणसं बदलली आहेत, जग बदललेले आहे, त्याप्रमाणे निसर्गही बदलला आहे. कडाक्याची थंडी, असह्या उष्मा आणि महावर्षा केव्हाही कधीही अनुभवली जाते आहे. चंगळवाद, प्रगती, सुख या नावाखाली निसर्गाची हेळसांड होते आहे. राज्यात राजकारणाचा दर्जा घसरला आहे. सर्व पक्षात भो-भो करणारे, खा खा करणारे वाढले आहेत. नेत्यांच्या भाषेचा दर्जाही घसरला आहे. हे सारे सहन होण्यापलीकडचे आहे. जातीयवादही तीव्र टोकावर आहे आणि या साऱ्या अवनितीला प्रस्थापित राजकारण जबाबदार आहे. परवा अचानक पाऊस पडला आणि हातातोंडाशी आलेला गहू, हरभरा जमीनदोस्त झाला. आंबा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी शेतीला मोठा फटका बसला. जमीनदोस्त झालेल्या गव्हाच्या रानात आडवे पडून आभाळाकडे पाहत शिमगा करणाऱ्या शेतकऱ्याचे चित्र सोशलमीडियावर व्हायरल झाले आहे. कांदा उत्पादक शेतकरी रोज रडत आहे. हजारो रूपये खर्च केले, कांदा पिकवला पण, दर नाही. कांदा बाजारात पाठवला तर उणे पट्टी मिळते आहे. शेतकऱ्यांनी रागारागाने कांद्याच्या पिकात नांगर घालून पिक मोडले, काहींनी लोकांना कांदे फुकट वाटले, काहींनी शहरात रस्त्यावर फेकून आंदोलन केले. तर काहींनी कांद्याची होळी करत निषेध व्यक्त केला. मन उद्धवस्त करणारी सारी परिस्थिती आहे जी अवस्था कांद्याची तीच अवस्था पालेभाज्यांची. आज भिकारी सुद्धा चहाला 10 रूपये द्या अशी हाक देतो. पण, शेतकऱ्यांनी पिकवलेली मेथी, कोथिंबीर शेतकऱ्यांकडून रूपया, दोन रूपये दराने खरेदी केली जाते आणि मंडईत पाच दहा रूपयांना पेंडी विकली जाते. वैतागलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या शहरात चौकात उभारून मेथी, कोथिंबीर जुड्या मोफत वाटल्याच्या बातम्या आपण बघतो आहोत. पण, बळीराजाच्या या दु:खाची कुणालाच पर्वा नाही. सारेच संवेदनाहिन झाले आहेत. सरकार कोणतेही असो ते संघटीत वर्गाच्या सर्व मागण्या मान्य करते आणि या वर्गाला सातवे वेतन देते. गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या मंडळींना फुकट कोथिंबीर घेताना आणि रस्त्यावर ओतलेले कांदे भरून नेताना काहीही वाटत नाही. दूध लीटरला दोन रूपये महाग झाले तर हा संघटीत वर्ग दंगा सुरू करतो पण, शेतकऱ्यांना कुणी वाली नाही. शासन मदतीच्या घोषणा करते, हमी दराच्या घोषणा करते, खरेदी केंद्राच्या याद्या जाहीर करते पण, प्रत्यक्ष त्याचा लाभ कुणाला होतो हे तपासले जात नाही. दूध दर दोन रूपयांनी वाढवले की दुसऱ्या दिवशी पशुखाद्याचे दर तीन रूपयांनी वाढतात. ऊसाला एफआरपी रक्कम देणार हे कळले की ऊसतोडीला एकरी चार हजार रूपये चहापाण्याला मागितले जातात. दिसेल त्या बाजूने शेतकऱ्याला लुटले जाते. अल्पभूधारक शेतकरी संपूर्णपणे लुबाडला जातो आहे. शेती आणि शेतकरी नागवला जावा त्या धंद्यातून कायमस्वरूपी उठावा असे पद्धतशीर धोरण आखले जाते आहे. शेजारच्या देशात कांदा, तेल, भाजीपाला यांचे दर ऐकले की अंगावर काटा येतो. तेथे त्यांच्या चलनाचे अवमूल्यन झाले आहे आणि देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे पण, आपण येथे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष न्याय का देऊ शकत नाही याचा विचार केला पाहिजे. हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाच्या तडाख्याने मातीमोल व्हावे याचे दु:ख समजून घेतले पाहिजे. संघटीत पगारदार वर्गाने या वाईट स्थितीत हात धुवून घेता कामा नये आणि बळीराजाची मजा बघता कामा नये त्याने कांदा स्वत:पुरता पिकवला तर सर्वांच्या डोळ्यात पाणी येईल. अन्य वस्तू जशा फायद्यात विकल्या जातात तशा शेतकऱ्यांनी पिकवलेल्या वस्तूही रास्त दराने विकल्या जाव्यात. दलाल वगैरे बाजूला करून शेतकऱ्यांनी आपल्या मालासाठी आपले ग्राहक व बाजारपेठ शोधली पाहिजे आणि त्यासाठी शेतकरी बाजार वगैरे सुविधा पाहिजेत. पण, बळीराजाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला आणि त्याला न्याय हक्क देण्याकडे कुणाचेही लक्ष नाही. नुसती भाषणे आणि राजकीय धुळवड सुरू आहे. बारा महिने चोवीस तास आरोप, शिवीगाळ, राडा, हल्ला आणि भ्रष्टाचार या पलीकडे काहीही नाही. अनेक नेत्यांनी आणि पक्षांनी त्यासाठी तरबेज माणसे नेमली आहेत. सोशल मीडियासाठी वॉररूम केल्या आहेत. सामान्य माणसे या राजकीय परिस्थितीला आणि एकमेकांवर होणाऱ्या शेणफेकीला वैतागली आहेत. शिवराळ भाषा आणि त्यासाठी संतांचे दाखले, मोठे खर्च करून केली जाणारी बॅनरबाजी, शक्तीप्रदर्शन आणि जात, धर्म, या विषयावर रान तापवून भाकरी भाजून घेणारे नेते व चेले सारेच लोकांचे हितशत्रू आहेत. सर्वसामान्य माणसे हा सारा खेळ जाणून आहेत. कालपर्यंत अंगावर नीट च•ाr नसलेली सत्ताधाऱ्यांच्या निकटची लहानमोठी प्यादी जमिनी, घरे कशी खरेदी करतात आणि महागड्या गाडया कशा पळवतात हे लोकांच्या लक्षात आले आहे. शिक्षण क्षेत्राचा, पेपरफुटीचा आणि गुणवत्तेचा, नोकरभरतीचा याच नेत्यांनी कसा बाजार मांडला आहे हे रोज अधोरेखीत होत असते. सारे संतापजनक व लोकहिताचा मुडदा पाडणारे आहे. शेतकऱ्याला, सामान्य माणसाला, असंघटीत वर्गाला व खासगी लहान संस्थात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कुठे आलो महाराष्ट्र म्हणण्याची वेळ रोज येत आहे. त्यावर उपाय शोधावा लागेल, जात, पात, पै पाहुणा या पलीकडे जाऊन जो राजकारण करेल त्यालाच मतदान केले पाहिजे. पंजाबने तेथील आमदारांना कितीही वेळा निवडून या तुम्हाला एकच पेन्शन दिली जाईल असे धोरणात्मक ठरवले आहे. देशात सर्व राज्यात तो कित्ता गिरवला गेला पाहिजे. जे चांगले ते स्विकारले पाहिजे व जे त्याज्य ते टाकले पाहिजे, वैर, दुष्टावा, वाईट वृत्ती, टाकून नवीन चांगले स्विकारायचे आहे. होळी आणि धुळवड याचा तोच अर्थ आहे. राजकीय पक्ष, नेतेमंडळी काहीही करोत, सामान्य जनतेने नवे चांगले सार्वहिताचे निर्णय केले पाहिजेत, चैत्राची पालवी प्रसन्न, नवी आनंददायी हवी होळीच्या ज्वालेत सर्व हिन नष्ट व्हावे, आणि रंगपंचमीत अवघा रंग एक व्हावा व तो लोकहिताचा, राष्ट्रहिताचा असावा.
Previous Articleपरीक्षेला हिजाब घालून येण्यास परवानगी नाही
Next Article भारताकडून धान्यपुरवठा, तालिबानने मानले आभार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








