पुणे / प्रतिनिधी :
राष्ट्रीय पक्षांना तळागाळातील प्रश्न समजण्यासाठी आणि ते सोडविण्यासाठी फार वेळ लागतो. त्याऐवजी प्रादेशिक पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जनतेने बळ देऊन विधानसभा आणि लोकसभेत पाठवले पाहिजे. देशातील प्रादेशिक पक्ष मजबूत झाले, तरच या देशातील लोकशाही अधिक बळकटपणे टिकून राहू शकेल, अशी भावना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केली.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या युवा संसदचे उद्घाटन महादेव जानकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दूल जाधवर आदी यावेळी उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे, इम्तीयाज जलील आणि रामदास तडस यांना यावेळी आदर्श खासदार पुरस्कार, नगरसेवक वसंत मोरे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार, तर जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील ठाकरे यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने महादेव जानकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.
जानकर म्हणाले, पैसा आणि घराणेशाही नसली तरीही सर्वसामान्य माणूस राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकतो, हा आत्मविश्वास युवा संसद सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांमध्ये निर्माण होतो. तरुणच या देशाचे उज्वल भवितव्य घडविणार आहे.
तडस म्हणाले, 40 वर्षाच्या राजकारणात वैयक्तिक जरी मी श्रीमंत झालो नसलो तरी जनता हीच माझी श्रीमंती आहे. युवकांनी राजकारणात येणे ही काळाची गरज आहे. युवकांच्या खांद्यावरच उद्याच्या देशाची जबाबदारी आहे.
बारणे म्हणाले, आत्मविश्वास असेल तर आपण राजकारणातही यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आपले काम पोहोचले पाहिजे.त्यासाठी कायम मनामध्ये सर्वसामान्यांविषयी तळमळ असणे गरजेचे आहे.
पाटील ठाकरे म्हणाल्या, सुशिक्षित तरुण देशाचा विकास गतीने करू शकतो. त्यामुळे तरुणांनी शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. उच्च शिक्षण घेऊन इंदापूर मधील ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्यांमध्ये काम करण्याची संधी मला मिळाल्यामुळे येथील प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या विकासासाठी काम करता येत आहे.