इतर घरफोड्यातील ऐवज मिळविण्यात अपयश
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरात झालेल्या चोऱ्या, घरफोड्यांच्या तपासासाठी मूळचा बेळगावचा व सध्या गोव्यात राहणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी त्याची चौकशी पूर्ण केली असून केवळ एका चोरी प्रकरणात चोरलेले दागिने परत मिळाले आहेत. त्यामुळे आता उर्वरित प्रकरणांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
12 जुलै रोजी सिंधुदुर्ग पोलिसांनी प्रकाश विनायक पाटील, मूळचा राहणार बेळगाव सध्या राहणार झरीवाडा, साखळी-गोवा याला अटक केली होती. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा अशा तीन राज्यांमध्ये घरफोड्या करून हैदोस घालणाऱ्या प्रकाशच्या अटकेनंतर बेळगाव येथील अनेक चोऱ्या, घरफोड्यांचा उलगडा होणार, अशी अपेक्षा होती.
उपलब्ध माहितीनुसार एपीएमसी, उद्यमबाग, टिळकवाडी, माळमारुती आदी वेगवेगळ्या पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात बेळगावात त्याने पाचहून अधिक घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे या प्रकरणात लुटलेले दागिने जप्त करण्यासाठी एपीएमसी पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला ताब्यात घेतले होते.
चौकशीत प्रकाशने दिलेल्या माहितीवरून दागिने जप्त करण्यासाठी एपीएमसी पोलिसांचे एक पथक 27 जुलै रोजी कणकवलीला गेले होते. बेळगावात चोरलेले दागिने कणकवलीत विकल्याची कबुली त्याने दिली होती. मात्र, सर्व प्रकरणांतील सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना अपयश आले असून केवळ एका प्रकरणातील 100 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करून त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. आता उर्वरित प्रकरणांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.









