खेड :
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने कोलाड ते वेर्णा दरम्यान कार रो-रो सेवेची घोषणा केलेली आहे. 23 ऑगस्टपासून या सेवेस प्रारंभ होणार आहे. मात्र कार रो-रो सेवेची आरक्षण प्रक्रिया सुरू होऊन आठवडा उलटला तरी कार सेवेच्या आरक्षणाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची बाब समोर आली आहे. या सेवेबाबत विचारणा करण्यासाठी 38 कॉल्स आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यातील एकाच व्यक्तीने कार वाहून नेण्यासाठी बुकिंग केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे गणेशभक्तांना गाव गाठताना कसरतीचा प्रवास करावा लागतो. विलंबाच्या प्रवासासह जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे गणेशभक्तांच्या मार्गात हाल होत असतात. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रशासनाने 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत चाकरमान्यांची हलक्या वजनांची वाहने वाहण्यासाठी कार रो-रो सेवा जाहीर केली आहे. 21 जुलैपासून या सेवेची आरक्षण प्रणाली खुली झाली आहे. मात्र आठवडाभराचा कालावधी उलटूनही अवघ्या एकाच व्यक्तीने रो-रो सेवेतून कार वाहून नेण्यासाठी बुकिंग केली आहे. कारण कार रो-रो सेवा गैरसोयीची असल्याचा सूर आळवला जात आहे. या रो-रो कार सेवेऐवजी अतिरिक्त जादा गाड्या सोडण्याचा आग्रह गणेशभक्तांकडून होत आहे.
कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांसाठी सुरू होणाऱ्या कार सेवेचा लाभ घेण्यासाठी वाहने थेट कोलाडला न्यावी लागणार आहेत. यानंतर थेट गोव्यात उतरली जाणार आहेत. कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक असते. मात्र कोकणातील स्थानकांवर वाहने लोड करण्यासाठी अन् अनलोडींगसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने कोकण मार्गावर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये थांबा मिळालेला नाही. याचमुळे गणेशोत्सवात धावणाऱ्या कार रो-रो सेवेकडे चाकरमान्यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसते.
- नोंदणी शुल्क परत केले जाईल
कोकण मार्गावर गणेशोत्सवात धावणाऱ्या कार ‘रो-रो’ सेवेसाठी आरक्षण प्रणाली सुरू झाली आहे. या सेवेसाठी 16 पेक्षा कमी गाड्यांची बुकिंग झाल्यास फेरी रद्द करून नोंदणी शुल्क परत केले जाणार असल्याचे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.








