वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी केरळच्या दौऱ्यावर होते. याप्रसंगी त्यांनी आपल्या भाषणात दहशतवाद आणि पाकिस्तानचाही उल्लेख केला. दहशतवादी संघटनांना पंतप्रधान मोदीच योग्य उत्तर देऊ शकतात, असा इशारा शाह यांनी दिला आहे. ‘पंतप्रधान मोदी आणि भाजपशिवाय कोणीही दहशतवादाला उत्तर देऊ शकत नाही.’ असे त्यांनी याप्रसंगी स्पष्टपणे सांगितले. शाह यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे उदाहरण दिले. भारतीय सैन्याने त्यांच्या सीमेत घुसून दहशतवाद्यांना ठार मारले. ही कारवाई केंद्र सरकारच्या दहशतवादाविरुद्ध ‘शून्य सहनशीलता’ धोरणाचे प्रतिबिंब असल्याचे शाह म्हणाले.
अमित शाह यांनी केरळ दौऱ्यावेळी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. आपल्याला केरळचा खरा विकास हवा असेल तर राज्यात भाजपचे सरकार असणे अत्यंत महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या स्वप्नाचा संदर्भ देत त्यांनी केरळनेही या विकासयात्रेचा भाग असले पाहिजे, असे नमूद केले. सध्या राज्यात सत्तेत असलेल्या एलडीएफ (डावा लोकशाही आघाडी) आणि यूडीएफ (युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट) सरकारांनी केरळला राष्ट्रविरोधी शक्तींसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनवले आहे, असा आरोपही अमित शाह यांनी केला. जर जनतेला केरळमध्ये बदल हवा असेल तर एलडीएफ किंवा यूडीएफ करू शकत नाही. राज्यात बदल घडवण्यासाठी एनडीए आणि भाजपला मतदान करावे लागेल. भाजपला केरळमधील राजकीय परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे, असेही ते पुढे म्हणाले.
अमित शाह यांनी भाजप आणि कम्युनिस्ट पक्षातील मूलभूत फरक देखील स्पष्ट केला. भाजपने कामगार परिषद इतर राजकीय पक्षांच्या सार्वजनिक परिषदाइतकीच मोठी केली आहे. हे केरळमध्ये भाजपच्या भविष्याचे प्रतीक आहे. आता आम्ही विकसित केरळची कल्पना करत आहोत. कम्युनिस्ट पक्ष फक्त केडर विकसित करतो, तर भाजप संपूर्ण देश आणि समाजाच्या विकासासाठी काम करतो, अशी सद्यस्थिती शाह यांनी मांडण्याचा प्रयत्न केला.









