डिझेल भरणाऱ्या कारने घेतला पेट : रामदेव समोरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील घटना
बेळगाव : डिझेल भरण्यासाठी स्विफ्ट कार रामदेव हॉटेल समोरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर गेली असता अचानक कारने पेट घेतला. यामुळे एकच गोंधळ उडाला. पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमनचा फवारा करून ती आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याला यश आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. नरेंद्र बिर्जे हे (रा. भारतनगर, शहापूर, कार क्रमांक के. ए. 22 एमए 3931 ) कारमध्ये डिझेल घालण्यासाठी गेले. त्यावेळी डिझेल घालतानाच अचानकपणे इंजिनमधून धूर यायला सुरुवात झाली. बघताबघता कारच्या इंजिनने पेट घेतला. यामुळे बराच गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन फवारणी केली. काही जणांनी पाण्याचा फवाराही केला. त्यामुळे आग आटोक्यात आली. त्यानंतर सावधानता बाळगत कार पेट्रोल पंपच्या बाहेर आणण्यात आली. आग कशामुळे लागली असा प्रश्न साऱ्यांनाच पडला. या प्रकारामुळे कार चालकालाही धक्का बसला. डिझेल घालण्यासाठी कार बंद करण्यात आली होती. त्यावेळी कारने अचानक कसा पेट घेतला? याचाच प्रश्न साऱ्यांना पडला. या घटनेत कारचे संपूर्ण इंजिन जळून खाक झाले आहे. जवळपास 2 लाखांहून अधिक रुपयांचे कारचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे या परिसरात गोंधळ उडाला. दोन्ही बाजूला पेट्रोल व डिझेल घालण्याची यंत्रे होती. त्यांना कोणताही धोका पोहोचला नाही.









