नवी दिल्ली :
हिंदीभाषिक पट्ट्यातील भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये भाजपने पूर्ण बहुमत मिळविले आहे. या निवडणुकांमध्ये तेलंगणा वगळता इतरत्र काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आणि आता डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसला नेमके काय करावे लागणार हे सांगितले आहे. काँग्रेसला स्वत:च्या कार्यपद्धतीत आमुलाग्र बदल करावे लागतील. अनेक गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज आहे. जोपर्यंत पक्ष हे बदल अंमलात आणत नाही तोवर तो भाजपला पराभूत करू शकत नाही. मी जेव्हा काँग्रेस पक्ष सोडला होता तेव्हा देखील हीच भूमिका मांडली होती. विरोधी पक्षांची आघाडी झाली तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु ही आघाडी किती दिवसांपर्यंत टिकणार हे कुणीच सांगू शकत नसल्याचे उद्गार आझाद यांनी काढले आहेत. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी तत्कालीन पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना 5 पानांचे पत्र लिहून पक्ष सोडण्याची घोषणा केली होती. काँग्रेसमधील गटबाजीमुळे ते नाराज झाले होते. पक्ष सोडल्यावर काही दिवसांनी आझाद यांनी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाची स्थापना केली होती. हा पक्ष सध्या प्रामुख्याने जम्मू-काश्मीरमध्ये सक्रीय आहे.









