पुणे / प्रतिनिधी :
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱया ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत प्रवेश घेण्यासाठी पालकांकडून संथ प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांपैकी निम्म्यापेक्षा कमी मुलांचे प्रवेश झाले आहेत.
आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव 25 टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो. त्यानुसार यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत राज्यातील आठ हजार 823 शाळांमध्ये प्रवेशासाठी एक लाख 1 हजार 846 जागा उपलब्ध आहे. या जागांवर प्रवेशासाठी तीन लाख 64 हजार 413 पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल केले होते. त्यानुसार प्रवेशाच्या निवड यादीसाठी पहिली सोडत काढण्यात आली असून, त्यामध्ये 94 हजार 700 मुलांना प्रवेश जाहीर झाले आहेत. या मुलांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी 8 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, प्रवेश प्रक्रियेचा संथ वेग पाहता 36 हजार 753 मुलांचे प्रवेशच निश्चित करण्यात आले. ही संख्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. अनेक पालकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने, प्रवेश घेण्यात अडचणी उद्भवत आहे. अशा परिस्थितीत उर्वरित मुलांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांचे प्रवेश करण्यासाठी अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
पहिल्या सोडतीनुसार 81 हजार 129 मुले प्रतीक्षा यादीत आहेत. मात्र, प्रतीक्षा यादीतील मुलांच्या प्रवेशाबाबत पालक संभ्रमावस्थेत आहेत.








