रस्त्यावरील खडी विस्कटून रस्त्याची दयनीय अवस्था : शासकीय अधिकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधींनासुद्धा रस्त्याच्या दुर्दशेकडे पाहण्यास वेळ नाही
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ते शाहूनगरपर्यंतच्या रस्त्यावरील खडी विस्कटून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या गावाकडे पाहण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधींनासुद्धा वेळ नसल्यामुळे शहरापासून अगदी 20 ते 25 किलो मीटरवर वसलेल्या एका दुर्गम भागातील गावासारखी झाली आहे. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी व या भागाच्या लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरण करून नागरिकांना सुखकर प्रवास करण्यास दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
फक्त अर्धा किलो मीटर रस्त्याचे डांबरीकरण
कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर पूर्ण डांबरीकरण करायचे सोडून सोमवारी गावातील चव्हाटा सर्कलपासून शाहूनगरकडे जाणाऱ्या गावच्या तलावापर्यंतच डांबरीकरण करण्यात आले आहे. याबद्दल ग्राम पंचायत सदस्यांना विचारले असता आम्हाला कुणाला बोलविले नाही. अधिक चौकशी केल्यानंतर मागील वर्षाचा चार लाखाचा निधी शिल्लक होता तो निधी या रूपाने अर्धा किलो मीटर डांबरीकरण केल्याचे सांगण्यात आले. परंतु अर्धा किलो मीटर डांबरीकरण रस्त्याची जाडी अगदी कमी असल्यामुळे एक पाऊस पडल्यास सदर डांबरीकरण टिकेल की नाही माहीत नाही, अशाही प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होताना दिसत आहेत.
कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर रस्त्याचे डांबरीकरण ग्रामीणच्या आमदार व महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निधीतून गेल्या 6 ते 7 वर्षापूर्वी करण्यात आले होते. सदर रस्त्यावरून बसेसची वर्दळ मोठी आहे. तसेच सदर रस्त्यावरून चारचाकी, दुचाकी वाहनांचीही वर्दळ मोठी आहे. यामुळे रस्त्याची दुरवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यावरील संपूर्ण खडी विस्कटून रस्ता खाचखळग्यांचा तयार झाला आहे. यामुळे वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. तसेच दुचाकी वाहनधारकांनाही खाचखळग्यातून वाहने चालविताना मान दुखावणे, मनका दुखावणे अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे. आणि नागरिकांच्या अशा रूपाने होणाऱ्या आर्थिक नुकसानीला शासन व लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत, अशा संतापजनक प्रतिक्रियाही नागरिकांतून व्यक्त होताना दिसत आहेत. तसेच निवडणुकीवेळी गावचा सर्वांगीण विकास करणार म्हणून विकासांचे गाजर दाखविणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता गावाकडे पहायला वेळ नाही का? असेही प्रश्न नागरिकांतून उपस्थित होताना दिसत आहेत.
60 फूट रूंदीकरण रस्ता कधी होणार ?
मागील दोन वर्षापूर्वी ग्रा.पं. च्यावतीने शाहूनगर ते कंग्राळी बुद्रुक या मुख्य रस्त्याचे 60 फूट रूंदीकरण करण्यासाठी ग्रा.पं. च्यावतीने सध्याच्या रस्त्याच्या मध्यापासून पूर्वेकडे 30 फूट व पश्चिमेकडे 30 फूट असे मार्कींग करण्यात आले होते. दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी जागा देण्यास सहकार्यही केले. परंतु नाला पुलापासून गावच्या तलावापर्यंतच्या रस्ता 60 फूट करण्यास काही अडचण्या आल्या. परंतु पश्चिमेकडील शेतकरी वेगाने मध्यापासून 30 फूट जागा देण्यास सहकार्य केले. परंतु पूर्वेकडील जागेमध्ये बुडा लेआऊट प्लॉट टाकलेल्या प्लॉटधारकांनी मध्यापासून 30 फूट जागा देण्यास सहकार्य न केल्यामुळे 60 फूटी रस्त्याचे स्वप्न हे स्वप्नच राहीले. परंतु अजून वेळ गेलेली नाही. ग्रा. पं. ने योग्य भूमिका मांडून तोडगा काढून रस्त्याचे नियोजन केले. 60 फूटी रस्ता होण्यास वेळ लागणार नाही, असेही शेतकरी वर्गातून प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत. तसेच साई कॉलनी येथील वळणावर तर रस्ता रूंदीकरण होणे अगदी गरजेचे आहे. नाही तर प्रवाशांनी व शालेय विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला एखादा अनर्थ घडल्यास यालाही ग्राम पंचायतीबरोबर शासनही जबाबदार असणार असल्याच्याही प्रतिक्रिया पालक वर्गातून व्यक्त होताना दिसत आहेत.
ग्रा. पं.चेही अक्षम्य दुर्लक्ष
गावचा सर्वांगीण विकास करणे, एक आदर्श गाव बनविण्यासाठी नागरिक गावचे जबाबदार लोकप्रतिनिधीं म्हणून ग्रा. पं. सदस्यांना निवडून देतात. परंतू निवडून आल्यानंतर हेच सदस्य निवडणुकीवेळी नागरिकांना दिलेली विकास कामांची आश्वासने पूर्ण करण्यात असमर्थ ठरतात. कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. ची एकूण 34 सदस्यसंख्या आहे. हे सर्व सदस्य दररोज याच खाचखळग्यांच्या रस्त्यावरून बेळगाव शहराला जात येत असतात. परंतु कोणालाही हा दयनीय रस्ता दिसत नाही, हे गावचे दुर्दैव म्हणावे लागेल. ग्रा.पं. सदस्यांनी गटातटाचे राजकारण न करता विकास कामांसाठी सर्वांनी एक होऊन मोठा निधी मागवून का रस्ता का करत नाहीत, अशाही प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.
रास्ता रोकोचा इशारा
कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ग्रा.पं. व ग्रामस्थांकडून शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधीकडे अनेकवेळा अर्जविनंत्या करूनदेखील कुणालाही अजून पाझर फुटला नाही. येत्या महिनाभरात जर रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही तर ग्रा. पं. व ग्रामस्थ रास्तारोको करतील. तसेच शहराचे कंग्राळी बुद्रुक हद्दीतून वाहणारे सांडपाणीसुद्धा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.









