वृत्तसंस्था/ चेन्नई
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद चेन्नई सुपरकिंग्जने पटकावले. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने आतापर्यंत ही आयपीएल स्पर्धा पाचवेळा जिंकली आहे. अहमदाबादमध्ये सोमवारी पावसाच्या अडथळ्यातील अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सचा शेवटच्या चेंडूवर पराभव करत विजेतेपद हस्तगत केले. चेन्नई संघातील अष्टपैलू रविंद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूवर अनुक्रमे षटकार आणि चौकार खेचत गुजरातचे आव्हान संपुष्टात आणले. पावसाच्या अडथळ्यामुळे पंचांनी हा सामना 15 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांना विजयासाठी डकवर्थ लेविस नियमाच्या आधारे 15 षटकात 171 धावांचे नवे उद्दिष्ट दिले होते. धोनीच्या अनुभवी कप्तानपदाने चेन्नईला ही स्पर्धा पाचव्यांदा जिंकता आली. सामन्यामध्ये चमत्कार घडविण्याची क्षमता केवळ एम. एस. धोनीमध्ये असल्याचे प्रतिपादन प्रख्यात उद्योगपती आणि इंडिया सिमेंट्सचे उपाध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी केली आहे. मंगळवारी श्रीनिवासन यांनी आयपीएल चषक जिंकणाऱ्या चेन्नई संघाचा कर्णधार धोनीचे खास अभिनंदन केले.









