ग्राहकांमध्ये संभ्रम, अफरातफर होण्याची दाट शक्यता
प्रतिनिधी /बेळगाव
पाणीपट्टी भरणाऱया ग्राहकांना केवळ कॅश पेड म्हणून शिक्का मारून बिल दिले जात आहे. परंतु यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. यावर ना पाणीपुरवठा मंडळाचा शिक्का, ना एलऍण्डटी कंपनीचा! यामुळे नेमके कोण बिल जमा करतंय? याची माहिती ग्राहकांना मिळत नाही. यापूर्वी असे खोटे शिक्के मारून अफरातफर झाली असल्याने कंपनीने नावासह शिक्का मारावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एलऍण्डटी कंपनीकडे महानगरपालिकेने वर्ग केली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या व्याप्तीत पाणीपुरवठा करणे व बिल वसुली हे काम एलऍण्डटी कंपनीकडून केले जाते. मागीलवषी बिल भरल्यानंतर पाणीपुरवठा मंडळाचा बिलावर शिक्का मारला जात होता. यामुळे बिल भरल्याची खात्री ग्राहकांना होत होती.
परंतु यावषी बिल भरल्यानंतर केवळ कॅश पेड हा इतकाच शिक्का मारला जात आहे. त्यावर एलऍण्डटी कंपनी अथवा पाणीपुरवठा मंडळाचा शिक्का नसल्याने ग्राहकांमधून संभ्रम व्यक्त होत आहे. त्यामुळे बिल भरल्यानंतर त्यावर अधिकृत शिक्का द्यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
यापूर्वी अनेकवेळा अफरातफर
केवळ पाणीपुरवठाच नाही तर वीज बिल वसुली करून शेकडो रुपये लाटण्याचा प्रकार यापूर्वीही घडला होता. बनावट शिक्के तयार करून बिलावर पेड म्हणून हे शिक्के मारून बिल वसुली करण्यात आली होती. त्यामुळे यापुढे तरी असे प्रकार घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.









