पाच वर्षांत सर्वात कमी पाणीसाठा, मागील वर्षापेक्षा 80 टक्के पाणीसाठा कमी
बेळगाव : गेली पाच वर्षे मान्सून पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पूर आला होता. मात्र यावर्षी मान्सूनचे प्रमाण निम्म्यापेक्षाही कमी झाले आहे. 2018 मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पाच वर्षांनी पाऊस कमी झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील जलाशयांमध्येही पाणीसाठा 25 टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. जर काही दिवसांत पाऊस झाला नाहीतर गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील हिडकल, नविलतीर्थ, हिप्परगी आणि आलमट्टी या जलाशयांमध्ये काही टीएमसीच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा यावर्षी असल्याची नोंद झाली आहे. पाऊसही मागील काही वर्षांच्या तुलनेत अत्यंत कमी झाला आहे. जुलै महिन्यामध्ये 235 मी.मी. पाऊस झाला पाहिजे. मात्र केवळ आतापर्यंत 118 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. जवळपास मागील वर्षांपेक्षा 50 टक्के पाऊस कमी झाला आहे. जून महिन्यामध्ये सरासरी 146 मी.मी. पाऊस झाला पाहिजे. मात्र केवळ 47 मी.मी. पावसाची नोंद झाली असून मागील वर्षाच्या तुलनेत 68 टक्के पाऊस कमी झाला आहे.
पावसाचे प्रमाण जसे कमी झाले तसा जलाशयामधील साठादेखील कमी झाला आहे. बऱ्याच जलाशयांनी तळ गाठला असून काही टीएमसीच पाणी सध्या या जलाशयामध्ये शिल्लक आहे. वास्तविक काही जलाशयांची क्षमता 6 टीएमसी ते 123 टीएमसीपर्यंत आहे. मात्र या जलाशयांमध्ये 3 किंवा 6 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात पाऊस झाला नाहीतर संपूर्ण जिल्ह्याबरोबरच उत्तर कर्नाटकाला देखील त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाने पाठ फिरविल्यामुळे सध्या मान्सूनची पेरणीदेखील काही प्रमाणात खोळंबली आहे. तर पाणी समस्याही गंभीर बनली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये पावसाने दमदार साथ दिली होती. 2019 ते 2022 पर्यंत पावसाने चांगली साथ दिली होती. मात्र यावर्षी पावसाने अजून तरी दडी मारली आहे. 2018 मध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पाच वर्षांनी पुन्हा परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील घटप्रभा नदीवर हिडकल जलाशयाची उभारणी करण्यात आली आहे. तर मलप्रभा नदीवर नविलतीर्थ, कृष्णा नदीवर हिप्परगी, घटप्रभा आणि कृष्णा नदीवर आलमट्टी धरणाची उभारणी करण्यात आली आहे.









