ऑक्टोबर-डिसेंबरदरम्यान 45 मि.मी. पाऊस कमीच : हंगाम शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे
बेळगाव : यंदा पावसाच्या प्रमाणात मोठी घट झाल्याने एकूण लागवड आणि पेरणी क्षेत्रावर परिणाम झाला आहे. 132 मि.मी. पावसाची गरज असताना केवळ 72 मि.मी. पाऊस झाला आहे. तब्बल 45 मि.मी. पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणीवर याचा परिणाम झाला आहे. 1 ऑक्टोबर ते 17 डिसेंबरदरम्यान केवळ 72 मि. मी. पाऊस झाला आहे. परिणामी जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पेरणी क्षेत्रावर परिणाम झाला आहे. गतवर्षी रब्बी हंगामात 3 लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. मात्र, यंदा त्या प्रमाणात घट झाली आहे. रामदुर्ग तालुक्यात ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान 25 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे रामदुर्ग तालुका पावसाअभावी ओसाड पडला आहे. सौंदत्ती, मुडलगी, यरगट्टी, रायबाग तालुक्यांतही पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे. रब्बी हंगामात विशेषत: वाटाणा, हरभरा, ज्वारी, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी होते. विशेषत: हरभरा आणि ज्वारीचे क्षेत्र अधिक आहे. मात्र, यंदा पावसाअभावी या क्षेत्रात देखील घट झाली आहे. यंदाच्या मान्सून म्हणजेच 1 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान 13 मि.मी. पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातही पिकांची मोठी हानी झाली आहे. तब्बल अडीच लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या शेतीची केंद्रीय पथकाने पाहणी केली आहे. शिवाय अहवाल शासनाकडे सादर केला आहे. शेतकरी आता भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगाम वाया गेल्याने रब्बी हंगामावर आशा होत्या. मात्र, रब्बी हंगामातील पिकांनाही फटका बसला आहे. त्यामुळे यंदाचे दोन्ही हंगाम शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे ठरले आहेत.
1 ऑक्टोबर ते 17 डिसेंबरपर्यंत झालेला पाऊस मि.मी. मध्ये
तालुके झालेला पाऊस पावसाची तूट
- अथणी 56 -58
- बैलहोंगल 86 -37
- बेळगाव 90 -43
- चिकोडी 94 -28
- गोकाक 76 -41
- हुक्केरी 95 -34
- खानापूर 142 -9
- रामदुर्ग 25 -81
- रायबाग 50 -55
- सौंदत्ती 39 -69
- कित्तूर 72 -49
- निपाणी 62 -50
- कागवाड 85 -16
- मुडलगी 44 -66
- यरगट्टी 49 -60









