गृहज्योती योजनेंतर्गत 200 युनिट देण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
गृहज्योती योजनेमुळे घरगुती विद्युत ग्राहकांना सरासरी 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात आली. परंतु, आता नवीन ग्राहकांना सरासरीऐवजी सरसकट 58 युनिट मोफत वीज देण्यात आली आहे. यामुळे बऱ्याच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळताना दिसत नाही. यामुळे नागरिकांना 58 युनिटपुढील सर्व वीजबिल भरावे लागत आहे.
काँग्रेस सरकारने सत्तेत येताच गृहज्योती ही महत्त्वाकांक्षी योजना लागू केली. घरगुती ग्राहकांची वार्षिक सरासरी काढून त्यांना निर्धारित युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येऊ लागली. 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यामुळे बहुतांश ग्राहकांची शून्य रुपये विद्युतबिले येण्यास सुरुवात झाली. जसजसा विजेचा वापर वाढत गेला, तसतसे विद्युतबिल देखील वाढत गेले.
गृहज्योती योजनेचा लाभ मिळत नसल्याने नवीन ग्राहकांची वादावादी
जुन्या ग्राहकांना गृहज्योती योजनेचा लाभ मिळत असला तरी नवीन ग्राहकांना केवळ 58 युनिटपर्यंतच मोफत वीज मिळत आहे. नवीन ग्राहकांना राज्य सरकारने सरसकट नियमावली लागू केली आहे. त्यामुळे 58 युनिटच्या पुढे वीजबिल आल्यास ते संपूर्ण बिल भरावे लागत आहे. यामुळे नवीन ग्राहकांना गृहज्योती योजनेचा लाभ मिळत नसल्याने हेस्कॉम कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांशी वादावादी करत असल्याचे प्रकार घडत आहेत.
अनेक नवीन ग्राहकांना मोफत विजेचा फटका
नवीन विद्युत ग्राहकांना 58 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जात आहे. एक वर्षाहून अधिक काळ झालेल्या ग्राहकांची मागील वर्षभराची सरासरी काढून त्यांना मोफत वीज द्यावी, अशी मागणी होत आहे. परंतु, नवीन ग्राहकांबाबत राज्य सरकारची एकच नियमावली असल्याने अनेक ग्राहकांना याचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.









