एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धरले धारेवर : पालकमंत्र्यांकडून कामे पूर्ण करण्याची सूचना
बेळगाव : शहरातील पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एलअॅण्डटी कंपनीवर देण्यात आली आहे. मात्र या कंपनीचे काम समाधानकारक नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सोमवारी या कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक महापालिकेमध्ये पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार राजू सेठ यांनी घेतली. यावेळी केवळ 46 टक्के काम पूर्ण झाल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर 2025 अखेरपर्यंत काम पूर्ण करू, असे आश्वासन दिले.
एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक महापालिकेमध्ये बोलाविण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अनेक कामे अर्धवट आहेत. खोदाई करून बऱ्याच दिवसांनंतर पाईप घातले जात आहेत. पाणीपुरवठा योग्यप्रकारे होत नाही. त्यामुळे जनतेच्या तक्रारी वाढल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. 2025 अखेरपर्यंत कामाची मुदत संपणार आहे. त्यामुळे तोपर्यंत कामे पूर्ण होणार का? असा प्रश्न विचारला. तर अत्यंत जलदगतीने आम्ही कामे पूर्ण करू, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
पाईप घालण्याचे काम पूर्ण करून तातडीने पाणीपुरवठा करावा. महत्त्वाचे म्हणजे केवळ 46 टक्के काम पूर्ण झाले असेल तर अजून जवळपास 55 टक्के काम पूर्ण करण्यास बराच कालावधी लागणार आहे. तेव्हा योग्य नियोजन करून लवकरात लवकर काम पूर्ण करावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीला आमदार राजू सेठ, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, विरोधी गटनेते मुज्जम्मील डोणी, नगरसेवक रवी साळुंखे, शहीदखान पठाण, उपायुक्त उदयकुमार तळवार यांच्यासह इतर अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.









