उन्हामुळे पाण्याच्या पातळीत घट : पावसाने अशाचप्रकारे हुलकावणी दिल्यास मे मध्यानंतर भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता
बेळगाव : शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही भागात आठ ते पंधरा दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत घट होत आहे. मे अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता तीस दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाने अशाचप्रकारे हुलकावणी दिल्यास मे मध्यानंतर भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. उन्हाच्या झळा वाढल्या असून पाण्याचा वापरही वाढत आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे. विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी घटली असल्याने सर्वांना नळाच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागत आहे. दररोज उन्हाचा पारा वाढत असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनातही वाढ झाली आहे. राकसकोप जलाशयात 2457 फूट इतका पाणीसाठा शिल्लक असून हा पाणीसाठा तीस दिवस पुरेल असे सांगण्यात येत आहे. वास्तविक पाहता यंदा डिसेंबर अखेरपर्यंत पाऊस झाला होता. त्यामुळे राकसकोप जलाशय तुडुंब भरले होते. तरीदेखील सध्या मागीलवर्षीच्या तुलनेत 5 फुटांनी पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या असलेला पाणीसाठा मेअखेरपर्यंत पुरेल असे सांगण्यात आले होते. मात्र हिडकल जलवाहिनीला गळती लागल्याने राकसकोप जलाशयातील पाणी उपशाचे प्रमाण वाढले होते. परिणामी राकसकोप जलाशयात सध्या असलेला पाणीसाठा 20 मेपर्यंत पुरेल, असे सांगण्यात येत आहे. एरव्ही महाशिवरात्रीनंतर वळीव पावसामुळे पाणीपातळीत वाढ होत असे. मात्र यंदा एप्रिल संपत आला तरी वळीव पावसाचा पत्ता नाही. दररोज पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. मात्र आतापर्यंत पावसाने बेळगावकरांना हुलकावणीच दिली आहे. सध्याची पाणीपातळी पाहता मे मध्यानंतर भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच विविध ठिकाणी जलवाहिन्यांच्या गळत्यांद्वारे पाणी वाया जात आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. शिवाय प्रशासनाप्रमाणेच नागरिकदेखील बेजबाबदारपणे पाण्याचा अपव्यय करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
डेडस्टोअरेजवर विसंबून
शहरातील बहुतांश कूपनलिका बंद अवस्थेत आहेत. यापूर्वी कूपनलिकांच्या पाण्याचा वापर दैनंदिन कामासाठी केला जात असे. पण कूपनलिका बंद असल्याने नळांच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. राकसकोप जलाशयातील पाणीसाठा संपुष्टात आल्यास भीषण टंचाई निर्माण होऊ शकते. पाणीसाठा संपल्यास डेडस्टोअरेजमधील पाणी उपसा करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र डेडस्टोअरेजमधील पाणीसाठा केवळ आठ दिवस होऊ शकतो. वळीव पाऊस तसेच पावसाची सुरुवात वेळेत झाल्यास पाणीटंचाईचे संकट टळण्याची शक्यता आहे.
प्रशासन पाऊले उचलणार का?
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने प्रशासनाचे लक्ष पूर्णपणे निवडणुकीकडे लागले आहे. शहरात निर्माण होणाऱ्या समस्या किंवा पाणीटंचाईच्या संकटाबाबत कोणत्याच उपाययोजना राबविण्यात आल्या नाहीत. आगामी काळात पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ नये, याकरिता आवश्यक उपाययोजना राबविण्याची अत्यंत गरज आहे. त्यादृष्टीने कूपनलिकांची दुरुस्ती व गळत्यांची दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. यादृष्टीने प्रशासन पाऊले उचलणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.









