विनेश फोगटचे पदक हुकल्याने सारा देश दु:खात : संसदेत क्रीडामंत्र्यांची सविस्तर माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची अव्वल कुस्तीपटू विनेश फोगट हिने मंगळवारी ऑलिम्पिक स्पर्धेची 50 किलो वजनगटात उपांत्यफेरी जिंकून निर्माण केलेला इतिहास एका तांत्रिक चुकीमुळे मातीमोल झाला आहे. अंतिम फेरीत धडक मारल्याने तिचे रौप्य पदक निश्चित झाले होते. तसेच सारा देश तिच्याकडून ‘सुवर्णवृत्ता’ची प्रतीक्षा करीत होता. पण अंतिम फेरी होण्यापूर्वीच तिचे वजन करण्यात आले असता ते 50 किलो 100 ग्रॅम भरले. याचाच अर्थ ती 100 ग्रॅम अधिक वजनाची ठरल्याने तिला नियमानुसार अपात्र घोषित करण्यात आले. इतकेच नव्हे, तर रौप्य पदकापासूनही वंचित राहिली आणि तिचा क्रमांक शेवटचा लावण्यात आला.
हा धक्का तिच्यासह सर्व भारतीयांना असह्या होता. तिला बुधवारी काही काळासाठी रुग्णालयातही उपचारांसाठी नेण्यात आले होते. तिला डिहैड्रेशनचा त्रास होत होता. तिच्यासह भारताचे संपूर्ण ऑलिम्पिक गृह दु:खात बुडाले होते. तथापि, नियमांसमोर कोणाचाही पर्याय चालत नसल्याने कोणी काही करु शकले नाही. भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. याबाबत अनेकांची सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. सरकारने विनेशला साथ ही नामुष्की ओढवल्याचा दावा अनेकांनी केला. तसेच आर्थिक मदत न केल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली, असेही आरोप झाले पण लोकसभेत क्रीडामंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने सरकारने विनेशला पूर्ण मदत केल्याचे स्पष्ट झाले.
पी. टी. उषाला संदेश
हे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांना काहीना काही उपाययोजना करण्याचा संदेश पाठविला होता. विनेशसाठी शक्य तितके सर्व प्रयत्न करा, असे त्यांनी कळविले होते. तथापि, फोगट हिला निर्णयाविरोधात अपील करण्याची संधीही मिळू शकली नाही, कारण 100 ग्रॅमचे अंतर असल्याने ती संधीही देता येत नव्हती.
पंतप्रधान मोदींकडून उत्साहवर्धक संदेश
भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भारतीय संघाचे सांत्वन केले होते. यावेळी विनेश फोगट दुर्दैवाने अंतिम फेरीत धडक देऊनही पदकापासून वंचित राहिल्यानंतर त्यांनी तिलाही ‘एक्स’ वरुन तिचे उत्साहवर्धन करणारा संदेश दिला आहे. ‘विनेश फोगटजी, आप चँपियनोंके चँपियन है. आप भारतका गौरव और प्रत्येक भारतीय के लिये प्रेरणा है. आपका झटका दुख देता है. काश शब्द निराशा की भावना को व्यक्त कर पाते, जो मै अनुभव कर रहा हूं की आप लचिलेपनका प्रतीक है. चुनौतियोंका डटकर मुकाबला करना हमेशा से आपका स्वभाव रहा है. मजबूत हो कर वापस आओ. हम सब आपके पक्ष में है.’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात लिहिले आहे. त्यांच्या या संवेदनशीलतेचेही अनेकांनी कौतुक केले आहे. तथापि, खेळातही राजकारण आणण्याचा प्रयत्न ज्या राजकीय पक्षांचे नेते करीत आहेत, त्यांच्यावर टीका होत आहे. सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया या संबंधात येत असून खेळात राजकारण नको, अशी भावना व्यक्त होत आहे.
आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेकडे नाराजी व्यक्त
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तेराव्या दिवशी बुधवारी क्रीडामंत्र्यांनी विनेश फोगटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याप्रकरणी सरकारची बाजू मांडली. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी विनेशला 50 किलो गटात कुस्ती खेळायची होती. मात्र, तिचे वजन 50 किलोग्रॅमपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आल्याचे सांगितले. यासंबंधी भारताने आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष पी. टी. उषा सध्या पॅरिसमध्ये आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्याशी बोलून योग्य ती कारवाई करण्यास सांगितल्याचेही क्रीडामंत्र्यांनी सभागृहात सांगितले.
70 लाखांहून अधिक आर्थिक मदत
ऑलिम्पिकच्या तयारीसाठी विनेश फोगटला खूप मदत करण्यात आली, असे क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत सांगितले. तिच्यासाठी खास वैयक्तिक प्रशिक्षक नेमण्यात आले होते. त्याच्यासाठी हंगेरीचे तज्ञ प्रशिक्षक व्होलर अकोस आणि फिजिओ अश्विनी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. सामर्थ्य आणि कंडिशनिंग तज्ञ आणि स्पॅरिंग भागीदार नियुक्त केले गेले. या सर्वांना सरकारने पैसे दिले होते. विनेशच्या ऑलिम्पिकिच्या तयारीसाठी सरकारने 70 लाख 45 हजार 775 रुपये खर्च केल्याचे क्रीडामंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी खर्चाची संपूर्ण माहितीही दिली.
विनेश फोगटला ग्रँड प्रिक्समध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक मदत केली होती. तसेच, 3 जुलै ते 13 जुलै दरम्यान माद्रिद येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी अतिरिक्त मदत देण्यात आली. याशिवाय फ्रान्समधील बोलोन-सुर-मेर येथे ऑलिम्पिकपूर्व प्रशिक्षणासाठी अतिरिक्त मदत देण्यात आली, असेही क्रीडामंत्री मांडविया यांनी सांगितले.









