कमाविले कोट्यावधी
दातांवरील उपचार अत्यंत महाग असू शकतो, याचमुळे कधीकधी स्वस्त उपचार मिळाल्यास चांगले वाटते. दातांमध्ये प्रचंड वेदना असल्यास आणि तुमच्याकडे पैसे कमी असल्यास स्वस्त उपचाराचा शोध घेतला जातो. परंतु स्वस्तातील हा व्यवहार कधीकधी महाग ठरू शकतो. असेच एक प्रकरण चेक प्रजासत्ताकमध्ये समोर आले आहे. तेथे 22 वर्षीय युवक आणि त्याच्या आईवडिलांनी दंतचिकित्सक म्हणून स्वत:ला सादर केले आणि ऑनलाइन ट्यूटोरियलच्या मदतीने कित्येक रुट कॅनाल आणि दात भरण्याचे काम केले.
चेक प्रजासत्ताकमध्ये प्रागपासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावरील हॅवलिकुव ब्रोड शहरात एका परिवाराची कहाणी अत्यंत अजब आहे. या परिवाराने दोन वर्षांपर्यंत प्रोफेशनल डेंटिस्ट म्हणून काम केले. एका अनधिकृत क्लीनिकमध्ये लोकांवर स्वस्त उपचार केले, त्यांच्याकडे कुठलेही वैद्यकीय प्रशिक्षण नव्हते आणि सर्जरी किंवा उपचारासाठी ते ऑनलाइन ट्यूटोरियलचा वापर करत होते. या परिवाराने अनेक रुग्णांचे दात काढणे, स्थानिक अॅनेस्थिशिया, रुट कॅनाल आणि दात भरण्याचे काम केले. 22 वर्षीय युवकाने स्वत:ला डेंटिस्ट ठरविले होते, परंतु त्याच्याकडे आवश्यक प्रोफेशनल ज्ञान नव्हते असे पोलिसांनी सांगितले आहे.
अनेक उपकरणे अन् सामग्री हस्तगत
युवकाने अॅनेस्थेटिक्ससोबत अन्य दंतसामग्रीही उपलब्ध करविली आहे. यात फिलिंग, क्लीनिंग पावडर, गोंद, इंप्रेशन सामग्री आणि बरेच काही आहे. नकली डेंटिस्टची आई (50 वर्षे) एका नर्सच्या स्वरुपात काम करत होती आणि प्रक्रियांसाठी आवश्यक सामग्री उपलब्ध करवित होती, तर त्याचे वडिल (44 वर्षे) रुग्णांसाठी कृत्रिम उपकरणं निर्माण करत होते.
दोन वर्षात दीड कोटी कमाविले
या तीन जणांच्या परिवाराने नकली डेंटल क्लीनिकल सुरू करत 4 दशलक्ष चेक कोरुना (1,85,500 डॉलर्स) म्हणजेच जवळपास दीड कोटी रुपये कमाविल्याचा पोलिसांचा अनुमान आहे. त्यांना मागील महिन्यात अटक करण्यात आली आणि त्यांच्या विरोधता अवैध व्यवसाय चालविणे, मनी लॉन्ड्रिंग, हल्ल्याचा प्रयत्न, ड्रग डीलिंग आणि चोरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. दोषी आढळल्यास तिघांनाही 8 वर्षांपर्यंत तुरुंगात रहावे लागू शकते. चेक प्रजासत्ताकमध्ये चेक डेंटल चेम्बरचे अध्यक्ष रोमन स्मूकलर यांनी दरवर्षी नकली डेंटिस्टच्या सुमारे 10 तक्रारी प्राप्त होत असल्याचे मान्य केले आहे.









