प्रतिनिधी,कोल्हापूर
जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा 31 तासांसाठी बंद झाल्याने गुरुवारी सर्वच क्षेत्रातील दैनंदिन कामकाज विस्कळीत झाल्याचे चित्र पहायला मिळाले. इंटरनेट सुविधेवर अवलंबून असणाऱ्या सर्वच बँकांमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प राहिले.शेअर मार्केटमध्येही हिच परिस्थिती राहिली.अनेक आयटी,खासगी कंपन्यांमध्ये कर्मचारी कामवर हजर असले तरी येथील दैनंदिन कामकाज अप्रत्यक्षरित्या बंद राहिल्याचे दिसून आले.फेसबुक,व्हॉटस्अॅप,इंस्टाग्राम असा सोशल अॅपवर अॅक्टीव्ह असणारे नेटीझन्सही गुरुवारी इनअॅक्टीव्ह राहिले.त्यामुळे त्यांच्यासाठीही आजचा दिवस कंटाळवाणा राहिला.एकंदरीत कोल्हापुरकरांनी गुरुवारी इंटरनेट बाहेरील दुनिया अनुभवली असली तरी इंटरनेट सुविधा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनल्याचेही यानिमित्ताने अधोरेखित झाले.
सोशल मीडियावरील अक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने शहरातील वातवरण तणावपूर्ण बनले होते.बुधवारी हिंदूत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली. या बंदला हिंसक वळण लागल्याने शहरात दगडफेक,तोडफोड असे प्रकार घडले.यामुळे प्रशासनाने गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपूर्ण जिल्हयातील इंटरनेट सुविधा बंद ठेवण्याचे आदेश दिले.बुधवारी रात्रीपासून इंटरनेट सुविधा बंद झाली.गुरुवारी शहरातील तणाव निवळल्याने दैनंदिन कामकाज सुरु झाले.मात्र इंटरनेट सुविधा बंद राहिल्याने अनेकांची मोठी गैरसुविधा झाली.
शेअर मार्केटमधील 100 कोटींची उलाढाला ठप्प
इंटरनेट सुविधा बंद राहिल्याने गुरुवारी जिल्ह्यातील शेअर मार्केटही बंद राहिले. शेअर मार्केटमध्ये ट्रेडर्सना व्यवहार करता आले नाहीत.त्यामुळे जिल्ह्यातील शेअर मार्केटला याचा मोठा फटका बसला.शेअर मार्केटमधून होणारी सुमारे 100 कोटींची उलाढाला गुरुवारी ठप्प राहिली.
चेक क्लिअरींग बंद 800 कोटींची उलाढाल ठप्प
बँकांची चेक क्लिअरींग सिस्टीम इंटरनेट अभावी बंद राहिली.चेकच्या माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहार गुरुवारी बंद राहिले.यामुळे जिल्ह्यातील 800 कोटींची उलाढाला ठप्प राहिली.क्लिअरींग हाऊसचे सबमेंबर असणाऱ्या सहकारी बँकांना इंटरनेट सुविधा बंद राहिल्याचा सर्वाधिक फटका बंद राहिला.
पैशाची ऑनलाईन देवाण-घेवाण बंद
सध्या ऑनलाईन व्यवहाराचेही प्रमाण वाढले आहे.गुगल पे,फोन पे,पेटीएम अशा अॅपवरुन होणारी पैशांची ऑनलाईन देवाण-घेवाण बंद राहिली.या अॅपवरुन होणाऱ्या व्यवहारातून दिवसाठी कोट्यावधींची उलाढाला होते.हि उलाढालाही गुरुवारी ठप्प राहिल्याने रोखारोखी व्यवहाराचे प्रमाणा वाढले.
एटीएम मशीन बंद
इंटरनेट सुविधा बंद राहिल्याने शहरातील बहुतांश एटीएम मशिनही बंद राहिली.त्यामुळे नागरिकांना एटीएम मशिनमधूनही पैसे काढता आले नाहीत.एटीएम बंद,ऑनलाईन अॅपवरुनही पैशांची देवाण-घेवाण बंद, बँकांमधील व्यवहारही बंद यामुळे नागरिकांची बँकींग व्यवहार करताना मोठी गैरसुविधा झाली.
खासगी अस्थापनांवरही परिणाम
शहरातील अनेक खासगी अस्थापनांचेही दैनंदिन कामकाज इंटरनेट सुविधेवरच चालते. मात्र गुरुवारी इंटरनेट सुविधा बंद राहिल्याने येथील दैनंदिन कामकाज अप्रत्यक्षरित्या बंद राहिले.