बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महानगरपालिकेमध्ये हस्तांतर केले जाणार आहे. या संदर्भात मंगळवार दि. 6 रोजी ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीमध्ये जिल्हा प्रशासनासोबत दिल्ली व पुणे येथील सदर्न कमांडचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत हस्तांतरणामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डचे हस्तांतरण केले जाणार जाणार असून कॅन्टोन्मेंट बोर्डने 112 एकर जागा महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्याचा निर्णय घेतला. परंतु यामधून बंगलो एरिया वगळण्यात आल्याने नागरिकांनी आक्षेप घेतला. लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरी वसाहती तसेच खुल्या जागांचे सर्वंकष सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. मागील आठ दिवसांपासून बेळगाव शहरातील कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण सुरू केले आहे.
परंतु कॅन्टोन्मेंट बोर्डकडून योग्य नकाशे मिळत नसल्याने सर्वेक्षणाची प्रक्रिया राबवताना अडचणी येत असल्याची तक्रार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली. कॅन्टोन्मेंट बोर्डने 112 एकर जमिनीमधीलच उतारे उपलब्ध करून दिले आहेत. उर्वरित उतारे उपलब्ध करून देण्यास कॅन्टोन्मेंटने असमर्थता दर्शवली असल्याने मंगळवारी होणाऱ्या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेण्यात येणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. या बैठकीमध्ये दिल्ली येथील डायरेक्टर जनरल, पुणे येथील प्रिन्सिपल डायरेक्टर, कॅन्टोन्मेंट अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, सीईओ राजीव कुमार, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह इतर अधिकारी ऑनलाईन बैठकीत सहभागी होणार आहेत.









