रत्नागिरी :
कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचे ऑनलाईन उद्घाटन सोमवारी लोहमार्ग पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्या हस्ते झाले. प्रवाशांना अधिक सुरक्षितता देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी येथे रेल्वे पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. गृह विभागाने मंजुरी दिली आणि प्रत्यक्षात हे ठाणे उभे राहिले.
उदघाटन कार्यक्रमाला लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा, कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट, महानिरीक्षक अभिषेक कुमार, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच लोहमार्ग विभागातील अनेक पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिक्रायांनीही या सोहळ्यात सहभाग नोंदवला.
रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याच्या स्थापनेमुळे पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र कमी झाले असून आता नव्या कार्यक्षेत्रात सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासु, नागोठणे आणि रोहा या स्थानकांचा समावेश झाला आहे. हे ठाणे हार्बर विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित राहणार असून पोलीस उपआयुक्त (मध्य परिमंडळ) यांच्या थेट नियंत्रणाखाली काम करणार आहे.








