विधानसभेत आमदारांनी वेधले लक्ष, बंदी घालण्याची मागणी : शेतकऱ्यांच्या हितासाठी थ्रीफेज वीज देण्याची विनंती
बेळगाव : ऑनलाईन गेमिंग, रमी, बेटींग, मटका, जुगार आदींमुळे तरुणाई अडचणीत येत असून अनेकांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. तरुणाईला वठणीवर आणण्यासाठी या जुगारावर सरकारने बंदी घालावी, अशी मागणी सोमवारी विधानसभेत करण्यात आली. उत्तर कर्नाटकच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलताना बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर यांनी या गंभीर समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील अनेक तरुण ऑनलाईन बेटिंग, रमी, जुगाराच्या नादी लागले आहेत. त्यामुळे ते आपले सर्वस्व गमावत आहेत. अनेक जणांनी आपले जीवन संपवले आहे. या जुगारामुळे तरुणाई पुरती अडचणीत आली आहे, असे सांगत त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
यावर पी. एम. नरेंद्रस्वामी यांनी ही समस्या गंभीर आहे. केवळ बिदर, बसवकल्याणपुरतीच ही समस्या मर्यादित नाही. त्यामुळे सरकारने जुगारावर बंदी घालण्याची मागणी केली. भाजपचे सी. सी. पाटील यांनी या सरकारमध्ये अपप्रवृत्तीचा वेग वाढला आहे, असा आरोप केला. त्यावेळी आमदार चंद्राप्पा यांनी तर एका आमदाराच्या मुलाने जुगारात सर्वस्व गमावले आहे. त्यामुळे आमदाराच्या सुनेने आत्महत्या केल्याचे उदाहरण आहे. जुगारावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी मटका, जुगार थोपविण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. या विषयावर सविस्तर चर्चा करूया. त्यानंतर सरकारकडून उत्तर देऊ, असे सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे पार्क उभारण्यासाठी मंजूर केलेले 10 कोटी रुपये अनुदान सरकारने परत घेतले आहे. ते त्वरित मंजूर करावे, पार्कची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी करतानाच शेतकऱ्यांच्या हितासाठी थ्रीफेज वीज देण्याची विनंती शरणू सलगर यांनी केली. रात्री अकरानंतर थ्रीफेज वीज दिली जाते. रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देताना सर्पदंश होऊन अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिवसा सात तास थ्रीफेज वीज देण्याची मागणी त्यांनी केली.
विधानसभेत नव्या छायाचित्रांचे अनावरण
विधानसभेत सोमवारी दुपारी भोजन विरामानंतर नव्या छायाचित्रांचे अनावरण करण्यात आले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू व मौलाना अबुलकलाम आझाद यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. याबरोबरच आधीचे स्वामी विवेकानंद, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीही छायाचित्रे सभागृहात आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते रिमोट दाबून अनावरण करण्यात आले. यावेळी सभाध्यक्ष यु. टी. खादर, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते आर. अशोक आदींसह अनेक नेते उपस्थित होते.









