गेमचे वाढते फॅड धोकादायक : नादी लागून अनेक तरुण कर्जबाजारी, फायद्यापेक्षा तोटाच अधिक; विद्यार्थ्यांना वेळीच सावध करणे गरजेचे, शहराबरोबरच ग्रामीण भागातही वाढ
बेळगाव : बेळगाव शहर व जिल्ह्यात ऑनलाईन गेमिंगचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे या प्रकाराच्या नादी लागून अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत. कर्जाची परतफेड करता न आल्यामुळे अनेकांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला आहे. खासकरून बेळगाव शहराबरोबरच ग्रामीण भागातही ऑनलाईन गेमचे फॅड वाढत चालले आहे. गेल्या वर्षीच्या शेवटच्या आठवड्यात 28 डिसेंबर रोजी रात्री सुलधाळजवळ एका विद्यार्थ्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. रेल्वे पोलिसांनी रेल्वेरूळाजवळ आढळून आलेल्या मोटारसायकलवरून मृतदेहाची ओळख पटवली. त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना त्याने आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली. कुटुंबीयांनी रेल्वे पोलिसांना दिलेली माहिती धक्कादायक होती. ऑनलाईन गेमिंगच्या नादी लागून या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. या तरुणाने आपल्या घरातून 5 लाख रुपये घेतले होते. वेगवेगळ्या ठिकाणी त्याने ती रक्कम पाठवली आहे. यापैकी 2 लाख रुपये मध्यप्रदेशमध्ये आरटीजीएसच्या माध्यमातून पाठवल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून त्या विद्यार्थ्याची ऑनलाईन ट्रॅन्झॅक्शनची माहिती मिळविण्यात येत आहे. पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच यासंबंधीचा अधिक उलगडा होणार आहे.
ऑनलाईन गेमिंगच्या नादी लागून रक्कम गमावणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. बहुतेक विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड फोन आहेत. झटपट पैसे मिळविण्यासाठी विद्यार्थी व तरुण ऑनलाईन गेमिंगच्या नादी लागताना दिसत आहेत. क्रिकेट बेटिंग, मटका, जुगारात आर्थिक फटका बसल्यामुळे अनेकांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. आता बेळगाव शहर व जिल्ह्यातील अनेक तरुणांनी ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमावल्यानंतर आपले जीवन संपविले आहे. दि. 9 ते 19 डिसेंबरपर्यंत सुवर्ण विधानसौधमध्ये झालेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही ऑनलाईन गेमिंग व सायबर गुन्हेगारीविषयी गांभीर्याने चर्चा झाली होती. ऑनलाईन गेमिंगचे अॅप बंद करण्यासाठी असलेल्या कायदेशीर अडचणींसंबंधी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी माहिती दिली होती. सरकारने एखाद्या अॅपवर बंदी घातली तर लगेच त्याचे चालक न्यायालयातून मनाई मिळवतात. काही कायदेशीर अडचणींमुळे त्यांच्यावर पूर्णपणे बंदी घालणे शक्य होईना, असे गृहमंत्र्यांनी सांगितले होते.
केवळ बेळगावच नव्हे तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यात ऑनलाईन गेमिंगच्या नादी लागून कर्जबाजारी झालेल्या तरुणांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. ऑनलाईन गुंतवणूक फायद्याची आहे, या समजुतीने बाहेर कर्ज काढून अनेक तरुण गुंतवणूक करताना दिसत आहेत. जादा व्याजाचे आमिष दाखवल्यामुळे हे तरुण गुंतवणूक करीत आहेत. अशा पद्धतीने ऑनलाईन गुंतवणूक करणाऱ्यांना फायद्यापेक्षा फटकाच अधिक वेळा बसला आहे.
ऑनलाईन गेमिंगच्या गुन्हेगारीत वाढ
कर्नाटकातील काही जिल्ह्यातील उदाहरणे लक्षात घेता कर्ज फेडण्यासाठी अनेक तरुण चोऱ्या, दरोडे करू लागले आहेत. काही चिनी कंपन्या ऑनलाईन कर्ज देण्यात आघाडीवर आहेत. एकदा या कंपन्यांकडून कर्ज घेतले की, त्यांचा त्रास सुरू होतो. वेळेत कर्ज भरले नाही तर तुमची एकांतातील छायाचित्रे समाजमाध्यमावर व्हायरल करू, असे धमकावण्यात येते. ऑनलाईन गेमिंगच्या प्रकारामुळे गुन्हेगारीत वाढ होत चालली आहे. अनेक जण शिक्षणासाठी, घर बांधण्यासाठी जमवून ठेवलेला पैसा ऑनलाईन गेममध्ये गमावले आहेत. चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्री ऑनलाईन जुगाराची जाहिरात करीत आहेत. सुरुवातीला छोटेमोठे फायदे झाल्यानंतर तरुणाई कर्ज काढून ऑनलाईन गेमिंगच्या
अॅपमध्ये गुंतवणूक करते. गुंतवणुकीची रक्कम वाढली की त्यांना फटका बसायला सुरुवात होते. एकदा ऑनलाईन गेमिंगच्या अॅपमध्ये गुंतवणूक करून कर्जबाजारी झाले की आर्थिक गणित विस्कटते. ते सरळ करण्यासाठी अनेक जण गुन्हेगारी कारवाया करू लागले आहेत. सध्या बेळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये ऑनलाईन गेमिंगचे फॅड वाढले आहे. पोलीस मटका, जुगारी अड्ड्यांवर छापा टाकतात. त्यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र, ऑनलाईन गेमिंग पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणेही कठीण जाते. हातात अँड्रॉईड मोबाईल किंवा एक लॅपटॉप जवळ असला की गेमिंगचे प्रकार सुरू करता येतात. त्यामुळे कुटुंबीयांची डोकेदुखी वाढली आहे. अनेक तरुण ऑनलाईन गेमिंगच्या नादी लागून बरबाद होताना दिसत आहेत. कायद्याने तर या प्रकारांवर आळा घालण्याची गरज आहेच, तसेच कुटुंबीयांनीही आपली मुले अशा अपप्रवृत्तींना बळी पडणार नाहीत, याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
अनेक गावांमध्ये विमानाचा गेम लोकप्रिय
ऑनलाईन गेमिंगमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. बेळगाव तालुक्यातील नंदिहळ्ळी, राजहंसगड, देसूर, सुळगा, येळ्ळूर, कडोलीसह अनेक गावांमध्ये विमानाचा गेम लोकप्रिय झाला आहे. विमानाचा गेम म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या या गेमच्या माध्यमातून अनेक तरुणांनी लाखो रुपये गमावले असून आर्थिक घडी विस्कटल्यामुळे काही जणांनी आपले जीवनही संपविले आहे.









