रत्नागिरी / प्रतिनिधी
कुरिअर परत करण्याच्या बहाण्याने तरूणाला 99 हजार रूपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.ही घटना शनिवारी दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडली.अनिल हरी सनगरे (40, रा. उमरे रत्नागिरी) असे फसवणूक झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी सनगरे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तकारदार हे ठाणे येथील एक्सलेंट मॅनेजमेंट सर्विसेस कंपनीत अकाऊंटट म्हणून कामाला आहेत. या कंपनीचे आलेले मारूती कुरिअर येथे आलेले पार्सल सनगरे कंपनीत हजर नसल्याने परत गेले होते. याबाबत सनगरे यांनी गुगल सर्च करून मारूती कुरिअर कंपनीचा मोबाईल मिळवला.दिनांक 31 डिसेंबर रोजी सनगरे यांनी मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता तुमचे कुरिअर परत पाठवायचे असल्यास 5 रूपये ऑनलाईन पाठवा असे समोरून सांगण्यात आले.
समोरील व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सनगरे यांनी 5 रूपये पाठवले. मात्र पैसे ट्रान्सफर न झाल्याने समोरील व्यक्तीने एक लिंक सनगरे यांच्या मोबाईलवर पाठवली. ही लिंक ओपन करताच सनगरे यांच्या खात्यातील प्रथम 90 हजार व नंतर 9 हजार रूपये कमी झाले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सनगरे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तकार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध भादंवि कलम 420 व माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (क)(ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.









