शहरी ग्राहकांना आणखी पंधरा दिवस करावी लागणार प्रतीक्षा
बेळगाव : मागील चार महिन्यांपासून बंद असलेली हेस्कॉमची मोबाईल वॉलेटची सेवा पुन्हा कार्यान्वित झाली आहे. परंतु, सध्या तरी ग्रामीण भागातीलच ग्राहकांना घरबसल्या विद्युत बिल भरता येईल. शहरी भागातील ग्राहकांना यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. हेस्कॉमने विद्युत ग्राहकांना घरबसल्या बिल भरण्याची सुविधा मागील सहा-सात वर्षांपासून दिली होती. हेस्कॉमच्या वेबसाईटसोबतच फोन पे, गुगल पे, पेटीएम, अॅमेझॉन पे यासह इतर मोबाईल वॉलेटमधून विद्युत बिल भरता येत होते. परंतु, 18 मार्च 2023 पासून हेस्कॉमने ही सुविधा बंद केली. वाढीव वीजबिल या अॅप्समध्ये येत नसल्यामुळे तांत्रिक कारण देत हेस्कॉमने ही सुविधा बंद केली. घरबसल्या विद्युत बिल भरता येत नसल्याने नागरिकांना बिल भरणा केंद्रांवर जाऊन गर्दी करावी लागत होती. बेळगावमध्ये बेळगाव वन, हेस्कॉमचे विद्युत बिल भरणा केंद्र, ग्रामीण भागात ग्राम पंचायतींमध्ये बिल भरावे लागत होते. यामुळे ऑनलाईन वीजबिल भरण्याची सुविधा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी ग्राहकांमधून होत होती. या मागणीनुसार ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. सध्या तरी ग्रामीण भागातील ग्राहकांना ऑनलाईन बिल भरता येऊ शकते. शहरी भागातील ग्राहकांना आणखी 15 ते 20 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
फक्त ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी सेवा उपलब्ध
गुगल पे, फोन पे, पेटीएम यासारख्या मोबाईल अॅपमधून विद्युत बिल भरण्याची सुविधा मागील काही महिन्यांपासून तांत्रिक कारणाने बंद होती. ग्रामीण भागातील ग्राहकांना या महिन्यापासून अॅपद्वारे घरबसल्या विद्युत बिल भरता येईल. परंतु, शहरी भागातील ग्राहकांना अजून पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
– एम. टी. अप्पण्णवर (कार्यकारी अभियंते हेस्कॉम)









