दरात वाढ नसल्याने विद्यार्थ्यांना दिलासा
प्रतिनिधी / बेळगाव
मागील काही दिवसांपासून बसपास प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या बसपासची मुदत 30 जूनपर्यंत वाढविली आहे. शिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीखातर ग्रामवन सेवा केंद्रातदेखील ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली असली तरी बसपासच्या दरात वाढ झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
मागील दोन वर्षांत कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले होते. त्यामुळे बसपास प्रक्रियेलाही म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. यंदा शैक्षणिक वर्षाला सुरळीत प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बसपास प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना बसपास मिळविण्यासाठी सेवा सिंधू पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. कागदपत्रांची पडताळणी करून बसपास उपलब्ध होणार आहे. बसपास अर्जासाठी रेशनकार्ड, शुल्क भरलेली पावती, प्रमाणपत्र, फोटो आणि अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.









