सांगोला प्रतिनिधी
आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाईन जुगार खेळत असताना तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख ८८ हजार व लॅपटॉप, मोबाईल हँडसेट असा एकूण सुमारे ३ लाख ७८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना शुक्रवार १७ रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास सांगोला शहरातील वासूद चौक येथील यश प्लाझा येथे घडली आहे. ही कारवाई पंढरपूर येथील प्रभारी सहाय्यक पोलीस अधीक्षक भूषण कुमार यांच्या पथकाने केली.
सांगोला शहरातील बसस्थानका समोर असलेल्या शहर पोलीस चौकी समोर ही धाड पडल्याने या ठिकाणी आयपीएल सट्टा चालतो याबाबत सांगोला पोलीस मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई इंडियन्स व लखनऊ सुपर जायंटस् यांच्यमध्ये चालू असलेल्या क्रिकेट मॅचवर ऑनलाईन जुगार खेळत असताना मिळून आले पोलिसांनी त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी वैभव तुळशीराम जाधव, वय २४, यश सिध्देश्वर जाधव, वय २४ दोघे रा. पुजारवाडी, सांगोला, ता. सांगोला व दिनेश श्रीरंग माळी, वय ३० रा. माळवाडी, सांगोला, ता. सांगोला अशी असल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून ८८ हजार रुपये रोख, २५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, २ लाख ९० हजार रुपये किंमतीचे ८ मोबाईल फोन व एलईडी टीव्ही असा सुमारे ३ लाख ७८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.









