भाजी मार्केटमध्ये आवक वाढल्याने भाजीपाला दरात किंचित घसरण : शेतातच निम्मा कांदा खराब झाल्याने शेतकरी हवालदिल
सुधीर गडकरी /अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात महाराष्ट्र कांदा दरात 300 रुपयांनी वाढ झाली असून रताळय़ाचा भावही प्रति क्विंटलला 500 रुपयांनी वाढला आहे. इंदूर आणि जवारी बटाटा भाव स्थिर आहे. भाजी मार्केटमध्ये आवक वाढल्याने भाजीपाल्याच्या दरात किंचित प्रमाणात घसरण झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना थोडय़ा प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा भाव वाढला आहे.
मुसळधार पावसामुळे कर्नाटकातील नवीन कांदा सुमारे 50 टक्के शेतामध्येच खराब झाला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये कांदा पिकाची लागवड करण्यात आली असून डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये नवीन कांद्याचे उत्पादन येणार आहे. सध्या दोन-तीन महिने महाराष्ट्र कांद्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. कर्नाटकातील नवीन कांद्याची काढणी सुरू असून तो शेतातच निम्म्या प्रमाणात खराब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे यंदा शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. राहिलेल्या कांद्यामध्येही पाणी शिरल्याने नवीन कांदा लवकर खराब होत आहे. यामुळे काही खरेदीदार महाराष्ट्र कांदा खरेदी करत आहेत.
शनिवारी देशातील सर्व बाजारात कांदा आवकेत घट झाली होती. परिणामी कांदा भाव प्रति क्विंटल 300 रुपयांनी वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा भाव वाढला असून अरब राष्ट्रे आणि दुबईला कांदा प्रति किलो 30 ते 35 रुपयांना विक्री होत आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय व्यापाऱयांकडून मिळाली.
रताळय़ांचा दर्जेदारपणा यंदा कमी
मंगळवारी खंडी पूजन आणि बुधवारी दसरा होता. त्यानंतर गुरुवार, शुक्रवार दोन दिवस हवामानात बदल निर्माण होऊन पाऊस पडला. यामुळे रताळी काढणे बंद झाले होते. यामुळे शनिवारी बाजारात केवळ 2500 पिशव्या आवक झाली होती. रताळी सध्या पंजाब व हरियाणा बाजारात मोठय़ा प्रमाणात जात आहेत. यंदा पाऊस अधिक व ऊन कमी असल्याने रताळी यंदा मोठी व दर्जेदार झाली नाहीत. तरीदेखील शनिवारी बाजारात आवक कमी झाल्याने रताळय़ाचा दर प्रति क्विंटल 500 रुपयांनी वधारला आहे. बटाटाही कमी प्रमाणात आला होता. सध्या जवारी बटाटय़ाला बेळगाव, गोवा, कारवार, दिल्ली, पंजाब, हरियाणा आदी बाजारांतून मागणी असून शनिवारी बाजारात केवळ 2600 पिशव्या आवक झाली. त्यामुळे बटाटा भाव स्थिर असल्याची माहिती अडत व्यापारी अशोक बामणे यांनी दिली.
सध्या बेळगाव जिल्हय़ासह इतर राज्यांमधून भाजीपाला आवक मोठय़ा प्रमाणात येण्यास प्रारंभ झाला आहे. कच्च्या भाजीपाल्याची आवक होण्यास प्रारंभ झाला आहे. यंदा भाजीपाल्याला भरमसाट भाव मिळत असल्याने शेतकऱयांनी भाजीपाला लागवड अधिक प्रमाणात केली आहे. यामुळे बेळगाव जिल्हय़ासह इतर राज्यांमधून भाजीपाला आवक मोठय़ा प्रमाणात येण्यास प्रारंभ झाल्याने भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत, अशी माहिती भाजी व्यापारी भैरू कंग्राळकर यांनी दिली.
भाजीपाला शेकडा भाव
- घटप्रभा मेथी———- 200 ते 220 रु.
- बेळगाव मेथी———- 150 ते 160 रु.
- बेळगाव कोथिंबीर—- 100 ते 130 रु.
- घटप्रभा कोथिंबीर—– 1600 ते 1800 रु.
- चायना कोथिंबीर—– 1000 ते 1100 रु.
- हायब्रिड कोथिंबीर—- 900 ते 1000 रु.
- शेपू——————— 100 ते 120 रु.
- पालक—————— 400 ते 600 रु.
- लाल भाजी———— 800 ते 1200 रु.
- स्वीट कॉर्न बेळगाव— 600 ते 700 रु.
- स्वीट कॉर्न घटप्रभा—- 800 ते 1200 रु.
- नवलकोल————– 300 ते 450 रु.
- कांदापात————– 300 ते 400 रु.
भाजीपाला प्रति 10 किलो
- गवार—————— 300 ते 400 रु.
- बिट——————– 400 ते 450 रु.
- इंदस ढबू मिरची——- 350 ते 450 रु.
- इंदिरा ढबू मिरची—– 500 ते 600 रु.
- रिंग बिन्स————- 400 ते 500 रु.
- नाशिक बिन्स———- 350 ते 400 रु.
- मखमली बिन्स——— 380 ते 420 रु.
- बेंगळूर बिन्स———- 350 ते 390 रु.
- कारली—————– 350 ते 400 रु.
- पांढरी कारली——— 300 ते 350 रु.
- वांगी——————- 400 ते 450 रु.
- बोळगी वांगी———- 300 ते 350 रु.
- काटी वांगी———— 450 ते 550 रु.
- भेंडी——————- 200 ते 350 रु.
- हिरवी मिरची——— 200 ते 300 रु.
- जी फोर मिरची——– 500 ते 600 रु.
- पांढरी मिरची——— 200 ते 300 रु.
- काळी मिरची———- 250 ते 350 रु.
- बटका मिरची———- 500 ते 650 रु.
- दुधी भोपळा प्रति डझन 200 ते 300 रु.
- गोल भोपळा प्रति क्विंटल 2000 ते 2500 रु.
- कोबी पोते————- 150 ते 200 रु.
- फ्लॉवर एक डझन—– 300 ते 350 रु.
- नवीन आले———— 280 ते 320 रु.
- जुने आले————— 550 ते 600 रु.
- टोमॅटो प्रती ट्रे ——— 500 ते 700 रु.
महाराष्ट्र कांदा प्रति क्विंटल
- गोळी—————— 1000 ते 1500 रु.
- मीडियम————— 1500 ते 1800 रु.
- मोठवड—————- 1800 ते 2300 रु.
- गोळा—————— 2300 ते 2500 रु.
कर्नाटक जुना कांदा प्रति क्विंटल
- गोळी—————— 300 ते 600 रु.
- मीडियम————— 800 ते 1200 रु.
- मोठवड—————- 1300 ते 1500 रु.
- गोळा—————— 1500 ते 1700 रु.
जवारी बटाटा भाव प्रति क्विंटल
- गोळी —————– 700 ते 800 रु.
- मीडियम ————– 1500 ते 1800 रु.
- मोठवड ————— 2000 ते 2300 रु.
- गोळा —————– 2300 ते 2500 रु.
लाल जमिनीतील जवारी बटाटा
- गोळी —————– 800 ते 900 रु.
- मीडियम ————– 1700 ते 2200 रु.
- मोठवड ————— 2200 ते 2500 रु.
- गोळा —————– 2500 ते 2700 रु.
- इंदूर बटाटा———— 2300 ते 2600 रु.
- आग्रा बटाटा———– 2200 ते 2400 रु.
- रताळी—————– 1200 ते 2100 रु.
मेथी 25 रुपये पेंडी : भाजीपाला दराने सर्वसामान्य अडचणीत
अतिपावसाचा भाजीपाला पिकावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होऊन भाज्यांचे दर भरमसाट वाढले आहेत. विशेषतः पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे कठीण झाले आहे.
आधीच महागाईच्या कचाटय़ात सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला आता वाढत्या भाजीपाल्यांच्या दराला तोंड द्यावे लागत आहे. पाऊस कमी झाल्यानंतर भाजीपाल्यांचे उत्पादन वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र पावसाने उत्पादनावर परिणाम झाल्याने आवक कमी झाली आहे. विशेषतः पालेभाज्यांमध्ये मेथीचा दर 25 रु. पेंडी आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात ढबू 80 रु. किलो, गाजर 60 रु., बिनिस 80 रु., ओली मिरची 60 रु., वांगी 60 रु., टोमॅटो 40 रु., बटाटा 30 रु., कोबी 10 रु. एक, फ्लॉवर 30 रु. एक, भेंडी 60 रु., कारली 60 रु., दोडकी 60 रु., गवार 60 रु., कोथिंबीर 10 रु. पेंडी, मेथी 40 रु. दोन पेंडय़ा, लालभाजी 10 रु. एक पेंडी, पालक 20 रु. चार पेंडय़ा, मुळा 20 रु. चार नग, कांदापात 20 रु. तीन पेंडय़ा असा भाजीपाल्याचा दर आहे.
सप्टेंबरमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे भाजीपाला पिकाला फटका बसला. लागवड केलेली भाजी पावसात कुजली. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊन भाज्यांचे दर भडकले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे अवघड झाले आहे. त्यामुळे काही नागरिक अंडय़ांना पसंती देत आहेत. सर्रास भाजीपाला दर 60 रु. किलोच्या पुढे असल्याने सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे परवडेनासे झाले आहे.
आधीच इंधन, गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांची दमछाक होत आहे. त्यातच वाढत्या भाजीपाल्याच्या दराने गृहिणींचे कंबरडे मोडले आहे. दरात वाढ झाल्याने हॉटेल-मेस चालक आणि गृहिणींना फटका बसला आहे.









