ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्के वाढविल्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशातच कांदा निर्यात शुल्क धोरणाविरोधात राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे यांनी आंदोलन छेडलं आहे. कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्यातील आळेफाटा चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कांद्याला प्रति क्विंटल 4000 रुपये दर मिळालाच पाहिजे, अशी मागणी कोल्हे यांनी केली.
कोल्हे म्हणाले, केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच केली. मात्र, या निर्णयाने शेतकरी समाधानी नाही. कांद्याला प्रति क्विंटल 4000 रुपये दर मिळालाच पाहिजे. सहा-सात महिने पुरेल इतका कांदा देशात उपलब्ध असताना केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवून शेतकऱयांच्या ताटात माती कालवण्याचं पाप केलं. निर्यात शुल्क लादणं ही अघोषित निर्यातबंदी आहे. असेच नेपाळमधून टोमॅटो आयात करून त्याचे दर पाडले आता कांद्याचे दर देखील असेच पाडण्याचं काम सरकार करत आहे.
मागील तीन-चार वर्षांपासून कांद्याला भाव नाही. कांदा टाकून दिला जात होता, त्यावेळी कोणी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाही. शेतकऱयांच्या मुळावर उठणाऱ्या या सरकारविरोधात आम्ही रास्ता रोको करत आहोत. जोपर्यंत कांद्यावरील निर्यातशुल्क मागे घेतलं जात नाही आणि कांद्याला हमी भाव मिळत नाही, तोपर्यंत केंद्रातील जो नेता महाराष्ट्रात येईल त्याचे कांद्याची माळ घालून स्वागत करावं, असेही कोल्हे म्हणाले.








