इंदोर बटाटा, तळेगाव बटाटा, आग्रा बटाटा भाव स्थिर तर रताळ्याचा भाव 300 रुपयांनी घसरला : कोबी-गोल भोपळा दरात वाढ
अगसगे : बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात रब्बी हंगामातील बेळगाव जवारी बटाटा आवक विक्रीसाठी दाखल झाला आहे. तर कांद्याची आवक कमी झाल्याचा परिणाम कांदा दरात प्रति क्विंटलला 300 रुपयांनी वाढ झाली आहे. इंदोर बटाटा, तळेगाव बटाटा आणि आग्रा बटाटा यांचा भाव प्रति क्विंटलला स्थिर आहे. तर रताळ्याचा भाव क्विंटलला 300 रुपयांनी घसरला आहे. भाजीमार्केटमध्ये लाल भाजी, मेथी, वांगी, साधी कोथिंबीर यांचा भाव कमी झाला आहे. तर इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. कोबी दरात आणि गोल भोपळा दरात वाढ निर्माण झाली आहे.
मागील शनिवार दि. 27 रोजी मार्केटयार्डमध्ये कांदा भाव प्रति क्विंटल 500 ते 1600 रुपये झाला होता. तर इंदोर बटाटा भाव 500 ते 1750 रुपये झाला होता. तळेगाव बटाटा 800 ते 1700 रुपये झाला होता. आणि रताळी भाव 350 ते 1000 रुपये झाला होता. बुधवार दि. 31 रोजी एपीएमसीमध्ये लिलावामध्ये कांदा दर क्विंटल 1000 ते 1700 रुपये, आग्रा बटाटा 1000 ते 1600 रु., तळेगाव बटाटा 1000 ते 1700 रुपये, रताळी 350 ते 800 रुपये भाव झाला होता. मात्र, आजच्या शनिवार दि. 3 रोजी झालेल्या बाजारात कांदा दरात 300 रुपयांनी वाढ झाला. भाव 1000 ते 2200 रुपये तर रताळी दरात 300 रुपयांनी घसरण झाली आहे. भाव 300 ते 650 रुपये झाला. तळेगाव बटाटा भाव 1000 ते 1800 रु., आग्रा बटाटा 1300 ते 1700 रु., इंदोर बटाटा 1000 ते 1900 रुपये दर झाले आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
उन्हाळी लाल जवारी बटाटा दाखल
बेळगाव, खानापूर तालुक्यामध्ये दरवर्षी उन्हाळ्यामध्ये रब्बी हंगामातील जवारी बटाटा उत्पादन घेण्यात येते. पावसाळी लागवड केलेली जवारी बटाटा बियाणे म्हणून दोन महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी खरेदी केली होती आणि लागवड केली होती. सध्या तालुक्याच्या पश्चिम भागातील गावातून लाल जमिनीतील बटाटा काढणीस प्रारंभ झाला आहे. यंदाच्या हंगामातील प्रथम नवीन जवारी बटाटा आलेल्या अडत दुकानामध्ये नवीन जवारी बटाटा पाहण्यासाठी गर्दी केली होती. यांचा भाव 600 ते 2600 रुपये झाला, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.
कांदा दरात 300 रुपयांनी वाढ
गेल्या एक महिन्यापासून कांदा दरात स्थिरता होती. यावेळी भाव 500 ते 1500 रु. टिकून होता. मात्र, कांदा आवकेत बुधवारी घट निर्माण झाली होती आणि भाव 500-1700 झाला होता. तर शनिवारच्या बाजारात देखील महाराष्ट्रातून केवळ 40 ट्रक कांदा आवक एपीएमसीमध्ये दाखल झाल्याने पुन्हा कांदा दरात 300 रुपयांनी वाढ झाली असून कांदा भाव 1000 ते 2200 रुपये झाला आहे, अशी माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.
रताळी भाव 300 रुपयांनी घसरण
रताळ्याचा भाव तीन महिन्यापूर्वी 1000 ते 2000 रुपये झाला होता. त्यानंतर गेल्या एक महिन्यापासून रताळी भाव 300 ते 1100 रुपये झाला होता. कारण दिल्ली, पंजाब, हरियाणा, पलवल, मध्यप्रदेशमध्ये थंडी प्रमाणात वाढ झाल्याने खाण्यासाठी रताळ्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. मात्र सध्या या ठिकाणी काही प्रमाणात गरमी वाढल्याने रताळ्याला मागणी कमी आहे. याचा परिणाम होऊन रताळी दरात 300 रुपयांनी घसरण झाली आहे, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.
इंदोर, आग्रा बटाटा भाव स्थिर
मार्केट यार्डमध्ये परराज्यातील इंदोर बटाटा आवक ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात येत आहे. डिसेंबरपासून बेळगावात इंदोर नवीन बटाटा येत आहे. सुरुवातीला कचवड येत होता. मात्र आता उत्तम दर्जाचा पाकड बटाटा विक्रीसाठी येत आहे. मागणी आणि आवकेत समांतरता असल्यामुळे एक महिन्यापासून आग्रा, इंदोर, तळेगाव बटाटा भाव स्थिर असल्याची माहिती बटाटा व्यापाऱ्यांनी दिली.
परराज्यातून गाजर आवक केली बंद
भाजीमार्केटमध्ये सध्या भाजीपाल्याचे दर नियंत्रणात आहेत. बेळगाव परिसरातील भाजीपाला आवक भाजीमार्केटमध्ये येत आहे. मटर मध्यप्रदेशातून येत आहे. शेतकऱ्यांनी गाजर भावासंदर्भात आंदोलन करताच व्यापाऱ्यांनी परराज्यातील गाजर मागवणे थांबवले आहे. सध्या बेळगाव गाजर तेवढेच येत आहे. बेंगळूरहून बिन्स, मुंबईहून बटका जी फोर ढब्बू मिरची आवक येत आहे. मेथी, लाल भाजी, बिट, वांगी आदी भाजीपाल्यांचे दर कमी झाले आहेत. तर गोल भोपळा व कोबी यांचा भाव वाढला आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.









