भाजीमार्केटमध्ये टोमॅटो, भेंडी, लिंबूचा भाव वाढला : इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर
सुधीर गडकरी/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा भाव प्रति क्विंटल 600 रुपयांनी कमी झाला तर इंदोर बटाटा, आग्रा बटाटा, बेळगाव जवारी बटाटा, रताळी यांचा भाव क्विंटलला स्थिर आहे. कांदा दरात थोड्या प्रमाणात घसरण झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. जवारी बटाटा आणि हासन बटाटा बाजारात दाखल झाल्याने इंदोर बटाटा भाव स्थिर झाला. भाजीमार्केटमध्ये टोमॅटो, भेंडी, लिंबूचा भाव वाढला आहे. तर कोबी, वांगी, हिरवी मिरची यांचा भाव थोड्या प्रमाणात कमी झाला आहे. इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत.
आतंरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा भाव कमी झाल्याने आणि केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर काही अटी घालून थोड्या प्रमाणात निर्यात करण्यास व्यापाऱ्यांना परवानगी दिली आहे. याचा परिणाम होऊन कांदा भावात 600 रुपयांनी घसरण झाली आहे. कांदा भाव सर्रास 2000 ते 3800 रुपये प्रतिक्विंटल झाला. आग्रा बटाटा 1000 ते 1650 रुपये, रताळी भाव 300 ते 1700 रुपये, बेळगाव जवारी बटाटा 300 ते 2500 रुपये, हासन बटाटा भाव 1600 ते 2200 रुपये झाला. शनिवारच्या बाजारात बटाटा, रताळी व काही भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. सध्या तालुक्यामध्ये रब्बी हंगामासाठी उन्हाळी बटाटा लागवडीसाठी जवारी बटाटा मीडियम व मोठवड आकाराचे 1200 ते 1800 रुपये दराने क्विंटल शेतकरी खरेदी करीत आहेत.
कांदा 600 रुपयांनी उतरला
गेल्या दोन महिन्यापासून कांदा भाव 4000 ते 6000 रुपये क्विंटल झाला होता. यामुळे कांद्याने सर्वसामान्यांचे वांदे केले होते. तर काही खाद्यपदार्थातून कांदा गायब झाला होता. देशभरातील विविध ठिकाणी कांद्याचे नवीन उत्पादन सुरू झाले आहे. कांदा भाव वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी घटली आहे. त्याचप्रमाणे बेळगाव बाजारातून कांद्याला मागणी कमी झाली आहे. भाव वाढल्याने शेतकरी मोठ्या प्रामणात कांदा आवक बाजारात विक्रीसाठी आणल्याचा परिणाम कांदा भाव शनिवारच्या सवालामध्ये क्विंटलला 600 रुपयांनी कमी झाला असल्याची माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्र कांदा जानेवारीमध्ये
संपूर्ण देशभरातील कांद्याचे सर्वात मोठे बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे मार्केट म्हणजे नाशिक कांदा मार्केट. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशाला पुरेल इतका कांदा उत्पादन घेण्यारे राज्य म्हणून देखील महाराष्ट्राला ओळखले जाते. या ठिकाणची जमीन कांदा व ऊस उत्पादनास उपयुक्त अशी आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात लागवड केलेली कांदा पिकाची काढणी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. तर बेळगाव मार्केट यार्डमध्ये जानेवारी महिन्यामध्ये कांदा आवक येण्याची शक्यता आहे, अशी माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.
इंदोरमध्ये बटाटा काढणीला प्रारंभ
इंदोरमध्ये बटाटा लागवड केली असून तीन-चार दिवसापासून काढणीला तुरळक प्रमाणात प्रारंभ झाला आहे. स्थानिक व्यापारी इंदोर बटाटा शेतवडीमध्येच शेतकऱ्यांकडून खरेदी करत असून त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या मार्केटना बटाटा विक्रीसाठी देखील पाठवत आहेत. बेळगावमध्ये जानेवारी महिन्यामध्ये नवीन इंदोर बटाटा आवकेच्या ट्रका दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती बटाटा व्यापाऱ्यांनी दिली.
उन्हाळी बटाटा डिसेंबरमध्ये लागवड
सध्या बेळगाव-खानापूर तालुक्यामध्ये रब्बी हंगामासाठी उन्हाळी बटाटा लागवड करण्यासाठी बियाणे म्हणून जवारी बटाट्याचा मीडियम व मोठवड आकाराचे बटाटे बियाणे म्हणून खरेदी करीत आहे. प्रति क्विंटल 1200 ते 1800 रुपये क्विंटल दराने खरेदी करीत आहेत. डिसेंबर महिन्याच्या 15 तारखेनंतर उन्हाळी रब्बी हंगामातील बटाटा लागवडीला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती बटाटा व्यापाऱ्यांनी दिली.
रताळी परराज्यांमध्ये निर्यात
तालुक्यामध्ये रताळी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले आहे. यंदा पाऊस नसल्यामुळे काही प्रमाणात रताळी किडकी झाली आहेत. उत्तम दर्जाची केवळ 30 टक्के झाली आहेत. या रताळ्यांना पंजाब, दिल्ली, हरियाना, उत्तर प्रदेश, पुणे, मुंबई आदी ठिकाणी ट्रकद्वारे परराज्यांमध्ये मागणीनुसार जात आहेत.
भाजीपाला दर स्थिर
भेंडी, मेथी, टोमॅटो भाव थोड्या प्रमाणात वाढला आहे. तर हिरवी मिरची, वांगी, कोबी यांच्या दरात किंचित घसरण झाली आहे. इतर भाजीपाल्याचा भाव स्थिर आहे. बिन्स बेंगळूरहून येत आहे. तर सध्या मटरची आवक मध्य प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात भाजीमार्केटमध्ये येत आहे. यंदा बेळगाव, खानापूर तालुक्यातील भाजीपाला आवक येत आहे. पावसाअभावी घटप्रभा परिसरातून केवळ 50 टक्के भाजी आवक भाजी मार्केटमध्ये येत असल्याची माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.









