सुधीर गडकरी : अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात महाराष्ट्र नवीन कांदा, कर्नाटक कांदा, पांढरा कांदा, इंदोर नवीन बटाटा, इंदोर जुना बटाटा, तळेगाव बटाटा, हासन बटाटा, रताळी व गूळ भाव या सर्वांचे दर प्रत्येक क्विंटलला स्थिर आहेत. रताळ्याला सध्या केरळ व तामिळनाडूमध्ये मागणी येत आहे.
भाजीमार्केटमध्ये भाजीपाल्यांचा भाव स्थिर आहे.
सध्या मार्केट यार्डमध्ये बटाटा परराज्यातून मोठ्या प्रमाणात येत आहे. तर महाराष्ट्रातून कांदा आवक विक्रीसाठी येत आहे. गूळ तालुक्यातील पूर्व भागातून येत आहे. लाल कांदा व पांढरा कांदा कर्नाटकातून येत असून ही आवक सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मोजक्याच दुकानांमध्ये कर्नाटकातील लाल आणि पांढरा कांदा येत आहे. बेळगाव व खानापूर तालुक्यामधून रताळी मोठ्या प्रमाणात येत आहे.
परराज्यातील नवीन इंदोर बटाटा भाव क्विंटलला 2000 ते 2400, तळेगाव बटाटा भाव 1800 ते 2200, हासन बटाटा भाव 2000 ते 3200, आग्रा बटाटा भाव 1900 ते 2300, इंदोर जुना बटाटा भाव 2900 ते 3200 ऊपये.
महाराष्ट्र जुना कांदा भाव 6000 ते 8200, महाराष्ट्र नवीन कांदा भाव 1500 ते 4000 ऊपये. पांढरा कांदा भाव 1000 ते 4000 ऊपये प्रतिक्विंटल भाव झाल्याची माहिती व्यापारी महेश कुगजी यांनी दिली.
बेळगाव जवारी बटाटा बियाण्यासाठी आणि थोड्या प्रमाणात गोव्याला मागणी आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू असल्याने लागवडीसाठी बियाणे म्हणून जवारी बटाटा शेतकरी खरेदी करीत आहेत. शनिवारी सुमारे 300 पिशव्या आवक झाली होती. आणि सध्या रताळ्याला केरळ व तमिळनाडूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या ठिकाणी जानेवारी महिन्यापर्यंत पोंगल नावाचा सण मोठ्याप्रमाणात साजरा करतात. यावेळी खाण्यासाठी म्हणून रताळ्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. म्हणून सध्या केरळ व तमिळनाडूला बेळगावमधून रताळ्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचप्रमाणे दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मुंबई आदी ठिकाणी देखील रताळी बेळगावहून जात आहेत. या रताळ्याचा भाव 1200 ते 1800. ऊपये आणि बेळगाव जवारी बटाटा भाव 700 पासून 2900 ऊपये क्विंटल झाला आहे व शनिवारी सुमारे 34000 पिशव्या आवक झाली असल्याची माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली.
एक महिन्यापासून कांदा, बटाटा नवीन आवकेला प्रारंभ
सध्या मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, रताळी, गूळ व भाजीपाल्यांचा भाव प्रतिक्विंटल स्थिर आहे. सध्या गेल्या एक महिन्यापासून कांदा, बटाटा नवीन आवकेला प्रारंभ झाल्याने दरात थोड्या प्रमाणात घसरण झाली असून दर आटोक्यात आले आहेत. यापूर्वी कांदा, बटाटा भाव वाढला होता. जानेवारीनंतर पुन्हा कांदा, बटाटा दरात घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अडत दुकानदाराने दिली.
भाजीमार्केटमध्ये देखील भाजीपाला दरात गेल्या दोन महिन्यापासून पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. शेपू, मेथी, पालक, कोथिंबीर, टोमॅटोसह इतर भाज्यांचे दर आटोक्यात आले आहेत. कारण बेळगाव परिसरातील भाजीपाला आवक वाढला असून याचा परिणाम दरावर झाल्याने पालेभाज्यांच्या दरात थोड्या प्रमाणात घसरण झाली आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.
जानेवारीमध्ये कांदा आवक वाढणार
सध्या महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील कांदा उत्पादन काढणीला प्रारंभ झाला आहे. थोड्याप्रमाणात कच्चा कांदा येत आहे. तरीदेखील याचा भाव 1000 पासून 4000 हजार ऊपये क्विंटल भाव सध्या सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील कांदा काढणीला जानेवारी महिन्यामध्ये सुऊवात होणार आहे. यावेळी मार्केटयार्डमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र कांदा आवक होणार आहे. यावेळी दरात घसरणदेखील होण्याची शक्यता आहे. यावेळी फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये उन्हाळ्याला सुऊवात होतो. यावेळी कांदा पूर्णपणे वाळलेला येतो. यावेळी कांदा खरेदी केल्यास तो कांदा वर्षभर टिकतो, अशी माहिती कांदा अडत दुकानदाराने दिली.
इंदोर जुना बटाटा अंतिम टप्प्यात
सध्या इंदोरमध्ये यंदाच्या मार्च, एप्रिल महिन्यामध्ये शीतगृहामध्ये साठवून ठेवलेला बटाटा पावसाळ्यासह आतापर्यंत विविध बाजारपेठेत मागणीनुसार पाठविला होता. तो बटाटा सध्या शीतगृहांमधील जवळपास संपत आला आहे. सध्या हा बटाटा अंतिम टप्प्यात असून आणखी दहा ते पंधरा दिवसपर्यंत बाजारात येणार आहे.
नवीन इंदोर बटाटा आवकेत वाढ
डिसेंबर महिन्याच्या 15 तारखेपासून इंदोरमधील नवीन बटाटा काढणीला प्रारंभ झाला असून मागणीनुसार देशातील विविध बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. सध्या हा बटाटा कचवड आहे. पाकड येण्यासाठी अद्याप एक महिना लागणार आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात हा बटाटा शीतगृहामध्ये साठवून ठेवण्यात येणार आहे व तो बटाटा पुन्हा वर्षभर विविध राज्यांमध्ये विक्रीसाठी इंदोरमधील व्यापारी तेजी-मंदी व्यवहार करतात.
त्याचप्रमाणे सध्या आता हा सण व तळेगाव बटाट्याचे नवीन आवक विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे सध्या बटाटा दर टिकून आहे, अशी माहिती बटाटा व्यापाऱ्यांनी दिली.
कर्नाटक कांदा मोजक्याच दुकानामध्ये
कर्नाटकातील लाल कांदा आणि पांढरा कांदा आवक जवळपास संपत आला आहे. मागील गेल्या तीन-चार महिन्यापासून कांदा आवक विक्रीसाठी मार्केट यार्डमध्ये मोठ्या प्रमाणात येत होती. पावसामुळे जवळपास 60टक्के कांदा खराब झाला होता तर उर्वरित 40टक्के कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल झाला होता. सध्या हा कांदा जवळपास संपत आला आहे. यापुढे महाराष्ट्र कांद्यावरच खरेदीदारांना अवलंबून राहावे लागणार आहे, अशी माहिती कांदा व्यापाऱ्याने दिली.
भाजीपाला भाव स्थिर
भाजीमार्केटमध्ये सध्या बेळगाव परिसरातील भाजीपाला आवक मोठ्या प्रमाणात येत आहे. पालेभाज्या आवकदेखील वाढली आहे. हा भाजीपाला गोवा, कोकणपट्टा व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात जातो. तसेच बेळगाव परिसरातील किरकोळ बाजारात देखील जातो. सध्या भाजीपाला भाव स्थिर आहे, अशी माहिती भाजीव्यापाऱ्याने दिली.









