इंदोर जुना बटाट्याचा भाव क्विंटलला 200 रुपयांनी वाढला : जवारी बियाण्याचा बटाट्याचा भाव 2500 ते 3200 रुपये
सुधीर गडकरी/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात महाराष्ट्र कांदा, कर्नाटक कांदा, इंदोर नवीन बटाटा, आग्रा, तळेगाव बटाट्याचा भाव प्रति क्विंटल स्थिर आहे. तर इंदोर जुना बटाट्याचा भाव क्विंटलला 200 रुपयांनी वाढला आहे. तर बेळगाव जवारी बियाण्याचा बटाट्याचा भाव 2500 ते 3200 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. भाजीमार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर शेकडा व दहा किलो भाजीपाल्याचे दर भडकले आहेत. भाजीपाल्यांच्या तुटवड्यामुळे भाजीपाला दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या भाकरीवरील भाजीच गायब होत आहे.
मागील तीन-चार महिन्यापासून कांदा दराने अर्धशतक पार केले होते. तीन हजार ते सहा हजार रुपये क्विंटल दर कांदा झाला होता. सध्या 1500 ते 2600 रुपये क्विंटल कांद्याचा भाव झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र, आता भाजीपाल्यांचे दर भडकल्याने पुन्हा पूर्वीचीच स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे महिला वर्गाच्या आर्थिक बजेटवर पुन्हा परिणाम झाला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून मागील शनिवार व बुधवारी कांदा, बटाटा भाव स्थिर झाला होता. दि. 23 रोजी शनिवारच्या बाजारात देखील कांदा, बटाट्याचा भाव स्थिर आहे. मात्र इंदोर जुना बटाट्याच्या तुटवडा असून मागणी जास्त असल्याने 200 रुपये क्विंटलला वाढला आहे.
2500 ते 3200 रु. बियाण्याचा भाव
सध्या बेळगाव, खानापूर तालुक्यामध्ये रब्बी हंगामातील उन्हाळी जवारी बटाटा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. गेल्या एक महिन्यापासून शेतकरी मार्केट यार्डमध्ये बियाण्यासाठी म्हणून जवारी मोठवड, मिडियम आकाराचा बटाटा खरेदी करीत आहे. यंदा पावसाअभावी जवारी बटाटा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली होती. तसेच काही शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीपेक्षा रताळी उत्पादनाकडे वळले, याचा परिणाम होऊन यंदा जवारी बटाटा उत्पादनात कमालीची घट निर्माण झाली आहे. यंदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना जवारी बटाट्याची कमतरता भासू लागली आहे. यामुळे बियाण्यासाठी जवारी बटाटा भाव 2500 ते 3200 रुपये झाला, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.
जुना इंदोर बटाटा 200 रुपयांनी वाढला
सध्या मार्केट यार्डमध्ये इंदोर नवीन बटाटा ट्रकची आवक येत आहे. मात्र नवीन इंदोर बटाट्यामध्ये काही प्रमाणात माती येत आहे. तसेच बटाटा कचवड (सोलपट गेलेली) येत आहे. यामुळे हॉटेल्स, मेस, वडापाव, पावभाजी व किरकोळ विक्रेते नवीन बटाटा खरेदी करत नाहीत. ते जुना इंदोर बटाटा खरेदीकडे वळतो. कारण जुना इंदोर बटाटा लवकर शिजतो, अशी माहिती बटाटा व्यापाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्र कांदा आवक सुरळीत
गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्रातील यंदाच्या हंगामातील कांदा आवक सुरळीत येत आहे. यामुळे प्रति क्विंटल 5000 रुपये असलेला कांदा भाव आज 2500 रुपयांवर येऊन पोहोचला आहे. सध्या कांदा काही प्रमाणात कच्चा आहे. तरीदेखील खरेदीदार महाराष्ट्र कांदाच खरेदी करीत आहेत. फेब्रुवारीनंतर कांदा वाळलेला पाकड येणार आहे. मार्केट यार्डमध्ये कांदा आवकेत स्थिरता टिकून असल्यामुळे कांदा भाव देखील स्थिर आहे, अशी माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.
भाजीपाला दर भडकले
यंदा पावसाने पाठ फिरविल्याने म्हणावे तसे पाणी साचले नाही. यामुळे नदी नाल्यांना पूर आला नाही. विहीर, कूपनलिकांना पाणीच थोड्या प्रमाणात येत आहे. कॅनॉल व बंधाऱ्यांना पाणी नसल्यामुळे घटप्रभा परिसरात पिकणारा भाजीपाला केवळ 30 टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. दरवर्षी वर्षभर घटप्रभा परिसरातील भाजीपाला बेळगाव भाजीमार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात येत असे. मात्र, यंदा पाणीच नसल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. सध्या बेळगाव परिसरातील भाजीपाल्यावर भाजीमार्केट अवलंबून आहे. भाजीपाल्याच्या तुटवड्यामुळे भाजीपाला भाव वाढला आहे. येत्या काही दिवसामध्ये पुन्हा भाव वाढण्णार आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.
रताळ्याची भरमसाठ आवक
कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळणारे पीक म्हणून रताळी उत्पादनाची ओळख आहे. यामुळे बेळगाव-खानापूर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी रताळी पिकाची लागवड केली आहे. मात्र, यंदा पाऊस कमी प्रमाणात झाल्याने रताळी मोठी तर झालीच नाहीत. लहान लहान आकारांची रताळी उत्पादन मिळाले आहे. तसेच रताळी किडकी जास्त प्रमाणात झाल्याने परराज्यामध्ये या रताळ्यांना मागणी नाही. उत्तम दर्जाच्या रताळ्यांना मध्यप्रदेश, गुजरात, फरिदाबाद, पंजाब, दिल्ली, उत्तरप्रदेश, दिल्ली आदी ठिकाणी मागणी असते. शनिवारी रताळी भाव प्रति क्विंटल 300 ते 1000 रुपये झाला, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.









