रताळ्याचा भाव स्थिर : भाजीमार्केटमध्ये कोथिंबीर, शेपू, बिन्स, कोबीसह इतर भाजीपाल्याच्या दरात घसरण
सुधीर गडकरी/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात यंदाच्या हंगामातील नवीन हासन बटाटा विक्रीसाठी दाखल झाला. या बटाट्याचा भाव प्रति क्विंटलला 400 रुपये ते 2500 रुपये झाला. तर कांदा दर प्रतिक्विंटलला 200 रुपयांनी कमी झाला. तसेच बटाटा भावदेखील 100 रुपयांनी कमी झाला तर रताळ्याचा भाव स्थिर आहे. भाजी मार्केटमध्ये टोमॅटोसह कोथिंबीर, शेपू, बिन्स, कांदा पात, भेंडी, कोबीसह इतर भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली आहे. टोमॅटोसह कांदा दरातदेखील 200 रुपयांनी घसरण झाल्याने सर्वसामान्यांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

दरवर्षीप्रमाणे हासन जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये जालंधर बटाटा बियाण्याची लागवड केली जाते आणि ऑगस्ट महिन्यामध्ये बटाटा काढणीला प्रारंभ करतात. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बेळगाव एपीएमसीमध्ये विक्रीसाठी दाखल होतो. हासन बटाटा सध्या थोड्या प्रमाणात कचवड आहे. पाकड बटाटा येण्यास अद्याप पंधरा दिवस लागणार आहे. पाऊस कमी प्रमाणात असल्याने बटाटा काढणीला जोर आला आहे. हा बटाटा खाण्यासाठीदेखील चवदार असून वेफर्स बनवण्यासाठी याचा उपयोग करतात. इंदूर, आग्रा बटाट्यावर अवलंबून असणारे काही खरेदीदार नवीन हासन बटाटा खरेदी करण्याकडे वळले आहेत. शनिवारी मार्केट यार्डमध्ये तीन ट्रक हासन बटाटा विक्रीसाठी# दाखल झाला असून याचा भाव प्रति क्विंटल 400 ते 2500 रुपये झाला, अशी माहिती मार्केट यार्डमधील क्लार्क कल्लाप्पा पाटील यांनी दिली.
कांदा 200 रुपयांनी कमी
महाराष्ट्रातील नाशिकमध्ये कांद्याच्या भावावरून बाजारपेठ बंद झाले होते. तर महाराष्ट्र शासनाने कांदा भाव ठरवून खरेदीसाठी एका खासगी कंपनीला निविदा दिल्या होत्या. तर केंद्र सरकारने भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्यामध्ये थोड्या प्रमाणात कपात केली होती. यामुळे कांदा भाव क्विंटलला मागील आठवड्यात 1000 ते 2800 रुपये झाला होता. सध्या महाराष्ट्रातील बाजार सुरू झाले आहेत आणि बेळगावला सुमारे 55 ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता आणि मागणी कमी असल्याने कांदा भाव शनिवारच्या बाजारात 200 रुपयांनी घसरण झाली असून यावेळी भाव 1000 ते 2500 रुपये झाला, अशी माहिती अडत दुकानदारांनी दिली.
बटाटा 100 रुपयांनी कमी
सध्या मार्केटयार्डमध्ये नवीन हासन बटाटा विक्रीसाठी दाखल झाला आहे. यामुळे किरकोळ विकणारे खरेदीदारांसह काही गोवा खरेदीदारांनी नवीन हासन बटाटा खरेदीकडे वळले. यामुळे इंदूर बटाट्याचा भाव 100 रुपयांनी क्विंटलला कमी झाला. हा बटाटा हॉटेल, मेस कॅन्टीन, वेफर्स-वडापाव बनवण्यासाठी उपयोग केला जातो. बाजारात शनिवारी इंदूर बटाट्याच्या सात ट्रक विक्रीसाठी दाखल झाल्याची माहिती अडत दुकानदारांनी दिली आहे.
टोमॅटोसह कोथिंबीर, भाजीपाल्याचे दर घसरले
दोन महिन्यापासून टोमॅटोचा भाव प्रति ट्रे 2300 ते 2700 रुपये झाला होता. यामुळे टोमॅटो दैनंदिन आहारापासून गायब झाला होता. मात्र टोमॅटोचे उत्पादन वाढल्याने टोमॅटोच्या भावात मोठी घसरण होऊन ट्रेचा भाव सध्या 400 ते 500 रुपये झाला आहे. त्याचप्रमाणे भाजीपाल्याचा भाव देखील भडकले होते. मात्र सध्या भाजीपाल्यांची आवक वाढली आहे. यामुळे भाजीपाल्याचे दरदेखील कमी झाले आहेत. सध्या उघडीप असल्यामुळे भाजीमार्केटमध्ये आवक वाढली आहे. व परराज्यातून भाजीपाल्याला मागणी कमी झाल्याने पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.









