रताळ्याचा भाव वाढला : मकर संक्रांतीला काही भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता
सुधीर गडकरी/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार पेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा दरात प्रती क्विंटलला 200 रुपयांनी तर इंदूर बटाटा दरात 100 रुपयांनी घसरण झाली आहे. रताळ्याचा भाव क्विंटलला 200 रुपयांनी वाढ झाली आहे. भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. तर मकर संक्रांतीला काही भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे.
मार्केट यार्डमध्ये सध्या विजापूर तालुक्यातील नवीन कांद्याची आवक आणि महाराष्ट्रातील नवीन आणि जुना कांदा विक्रीसाठी येत आहे. यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. मागणी कमी प्रमाणात झाल्याने मागील आठवड्याच्या नुलनेत कांद्याचा भाव प्रती क्विंटलला 200 रुपयांनी कमी झाला आहे.
इंदूर, तळेगाव, आग्रा बटाट्याची आवक सुरू
इंदूर, तळेगावसह आग्रा बटाट्याची आवक बाजारात विक्रीसाठी येत आहे. इंदूरमध्ये सध्या नवीन बटाटा काढणीला प्रारंभ झाला आहे. शेतामधूनच व्यापारी व शेतकरी देशातील विविध बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पाठवत आहेत. बटाटा अजूनही कच्चा आणि कचवड आहे. पाकड बटाटा येण्यास अद्याप 15 दिवस लागणार आहेत. पाकड बटाटा येण्यास सुरुवात झाल्यास इंदूरमध्ये तेजी-मंदी करणारे व्यापारी शितगृहांमध्ये साठवणूक करून ठेवतात. त्यांनतर वर्षभर विविध बाजारात विक्रीसाठी पाठवतात. तळेगाव बटाटा एक-दोन महिन्यांमध्ये संपण्याची शक्यता आहे. सध्या आग्रा बटाटा मागील वर्षाचा शितगृहामधीलच येत आहे. नवीन बटाटा येण्यास अद्याप विलंब आहे. इंदूर बटाटा कचवड व कच्चा असल्याने किरकोळ विक्रेते आग्रा बटाटा खरेदीकडे वळले आहेत. यामुळे आग्रा बटाट्याला मागणी वाढली असल्याची माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.
रताळ्याच्या आवकेत वाढ
कृषी उत्पन्न बाजार पेठेमध्ये रताळ्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारच्या बाजारात रताळ्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. शनिवारी पुन्हा बाजारात रताळी आवक कमी झाली होती. परराज्यामध्ये थंडीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पंजाब, हरियाणा, मुंबई, उत्तर प्रदेश आदी ठिकाणी रताळ्याला खाण्यासाठी मागणी वाढली आहे. यामुळे रताळ्याचा भाव मागील आठवड्याच्या तुलनेत शनिवारी प्रति क्विंटलला 200 रुपयांनी वाढला आहे, अशी माहिती अडत व्यापारी अशोक बामणे यांनी दिली.









