एपीएमसी बाजारात भाजीपाल्यांचा तुटवडा, दरात किंचित वाढ, टोमॅटो प्रतिकिलो पुन्हा 200 रुपयांनी वधारला
सुधीर गडकरी/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा, इंदूर बटाटा, आग्रा बटाटा, रताळी यांचा भाव प्रती क्विंटलला स्थिर आहे. तर भाजीमार्केटमध्ये काही भाजीपाल्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या भाजीपाल्यांचा दरात किंचित प्रमाणात वाढ झाली आहे. तर इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. टोमॅटोची आवक कमी प्रमाणात येत असल्या कारणाने टोमॅटोचा भाव प्रती ट्रे पुन्हा 200 रुपयांनी वधारला आहे. मागील आठवड्यामध्ये कांदा दर आणि रताळी दरात क्विंटलला 300 रुपयांनी वाढ झाली होती. कारण आषाढी एकादशी असल्याने आवक कमी प्रमाणात दाखल झाली होती. यामुळे दरात वाढ झाली होती. तसेच पावसाअभावी भाजीपाल्याची आवक कमी आल्याने टोमॅटो कोथिंबीर, फ्लॉवर, घेवडा यांच्या दरात वाढ झाली होती. मात्र आजच्या शनिवारच्या बाजारात कांदा, बटाटा आवक थोड्या प्रमाणात वाढ झाली होती. यामुळे कांदा, बटाटा दर स्थिर झाले तर काही भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. मात्र टोमॅटोचा भाव मात्र मागील आठवड्याच्या दराच्या तुलनेत पुन्हा 200 रुपयांनी वाढ झाली आहे.
आषाढी एकादशी संपल्याने महाराष्ट्रातून शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची कांदा आवक विक्रीसाठी येण्यास जोर धरु लागली आहे. तर महाराष्ट्रामध्ये पाऊस काही भागात सुरू असल्याने कांदा काही प्रमाणात खराब येत आहे. यामुळे काही व्यापारी उत्तम दर्जाचा टिकाऊ कांदा शोधण्यासाठी मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांची दुकाने फिरुन चांगला कांदा खरेदी करण्याकडे वळले आहेत. तर इतर व्यापारी थोड्या कमी दरात मिळत आहे म्हणून मिळेल तो कांदा खरेदी करीत आहेत. आवक थोड्या प्रमाणात वाढल्याने शनिवारी कांद्याचा भाव स्थिर राहिला.
सध्या बेळगाव तालुक्यात जवारी बटाटा संपला आहे. खरेदीदारांना इंदूर व आग्रा बटाट्यावर अवलंबून रहावे लागत आहे. सध्या एपीएमसीमध्ये शितगृहामध्ये साठवून ठेवलेला इंदूर व आग्रा बटाटा ट्रक येत आहेत. खरेदीदार आपल्या निवडीप्रमाणे पसंदीचा आग्रा व इंदूर बटाटा खरेदी करीत आहेत. बटाटा भाव स्थिर आहे, अशी माहिती अडत दुकानदारांनी दिली.
उन्हाळी लागवड केलेली रताळी आवक अजूनपर्यंत मार्केट यार्डला मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली होती. दरवर्षी आषाढी एकादशीनंतर रताळी आवक आटोक्यात येते. रताळ्याला आषाढी एकादशीलाच महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्या रताळी आवक आटोक्यात आली आहे. व भाव स्थिर असल्याची माहिती अडत व्यापारी अशोक बामणे यांनी दिली.
टोमॅटो दोनशेने वाढ
सध्या काही भाज्यांचे दर स्थिर आहेत. तर मोजक्याच भाजीपाल्याचा दर वाढला आहे. पावसाअभावी भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे भाजीपाल्याचा दर वाढत आहे. व टोमॅटोचा भाव पुन्हा 200 रुपयांनी वाढला आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.









