ओरोस :
पत्नीला घातक शस्त्राने गंभीर दुखापत पोहोचवल्याप्रकरणी दोषी धरून सुरज बेंजामिन घंटेपोक (32, मूळ रा. आंध्रप्रदेश) याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी एक वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.
केळूस येथील भारती व आंध्रप्रदेश येथील सुरज घंटेपोक यांचा 18 डिसेंबर 2022 रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर सूरज हा पत्नी भारती यांना सतत शिवीगाळ व मारहाण करीत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून भारती या ऑगस्ट 2023 पासून पिंगुळी येथे भाड्याने राहत होत्या. त्यानंतर सूरज त्या ठिकाणी राहायला आला व तेथेही शिवीगाळ व मारहाण सुरु केली. त्यामुळे त्या केळूस येथे राहायला गेल्या.
दरम्यान, त्या पिंगुळी म्हापसेकर पिठा येथील एका दुकानात कामाला होत्या. 23 मार्च 2024 रोजी त्या नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजता दुकानात कामाला आल्या. त्यानंतर 10.30 च्या सुमारास सुरज हातात चाकू घेऊन दुकानात घुसला आणि पत्नीच्या मानेवर, पाठीवर त्याने चार वार केले. या हल्ल्यात भारती या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. या घटनेनंतर आरोपी सुरज पळून गेला होता. त्याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
या प्रकरणी भारती यांच्या तक्रारीनुसार सूरज याच्यावर भा. दं. वि. कलम 307 नुसार खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. सिंधुदुर्गनगरी येथील न्यायालयात झालेल्या या खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. यापैकी फिर्यादी भारती आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली.
न्यायालयासमोर आलेले साक्षीपुरावे आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्या मानून न्यायालयाने आरोपीला भा. दं. वि. 307 ऐवजी भा. दं. वि. कलम 324 (घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे) नुसार दोषी धरून शिक्षा सुनावली.
न्यायालयीन कामकाजात आरोपीला न्यायालयात हजर ठेवण्यासाठी कोर्ट पैरवी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. एस. सावंत, कॉन्स्टेबल अनिता कोळी यांनी साह्या केले.








